पालघर ( वाडा) :- वाडा तालुक्यात झालेल्या घटनेत महाविद्यालयातून गावाकडे सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून घेऊन निघालेल्या एका तरुणीवर याच भागांतील ३० वर्षीय विकास पवार याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी ( दि. १८) वाडा तालुक्यांत घडली आहे. या घटनेतील आरोपीला वाडा पोलीसांनी अटक केली आहे.
तालुक्यातील कुडूस येथे नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला तीचे वडील भेटायला आले होते. वडिलांसोबत घरी जात असताना आरोपी विकास याने दोघांनाही दुचाकीवर बसवून मी घरी सोडतो अशी बतावणी केली. वाटेतच वडिलांना उतरवून तुम्ही मधल्या रस्त्याने घरी पोहोचा असे सांगून तरुणीला जंगलात नेऊन जबरदस्तीने अत्याचार केले. या घटनेची कुणालाही माहिती दिली तर ठार करीन असा सज्जड दम देउन आरोपी फरार झाला.
वाडा पोलीसांकडे याबाबत तक्रार करताच तांत्रिक मदत घेउन मोठया कौशल्याने आरोपीला तातडीने बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित साबळे करीत आहेत. दरम्यान तरुणींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याबाबत कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
Discussion about this post