हिवाळा आला की शेकोटीची आवर्जून आठवण येते.भल्या पहाटे व रात्री ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत असत.
तीनचार दिवसांपासून थंडी मी म्हणते आहे.तापमानाचा पारा वरचेवर खाली जात आहे.काल तर पहाटेचे तापमान दहापेक्षाही कमी होते.
हिवाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले तरीही हिवाळा अजिबात जाणवत नव्हता.
बंगालच्या उपसागरात उद्भवलेल्या वादळामुळे मधेच अवकाळी पाऊस पडून गेला.त्यामुळे थंडी आणखीन काही दिवस लांबली होती.परंतु आता हिवाळा चांगलाच जाणवत आहे.
मोसमी हवामान लाभलेल्या आपल्या देशात तीन भिन्न सीजन येतात.
पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा! पावसाळ्यात सतत पाऊस लागून राहीला तर घराबाहेर पडता येत नाही.कडक उन्हाळ्यात तीच तर्हा असते.
हिवाळ्यात मात्र गुलाबी थंडी पडते.अशी थंडी हवीहवीशी वाटते.
कधीकधी ही थंडी हाडांना भेदणारी असते.परंतु शेकोटी पेटवून अशा थंडीचाही आनंद घेता येतो.
थंडीचा सिझन कुणाला आवडत नाही?
जवळपास सगळ्यानांच हिवाळा आवडतो, असा आमचा अंदाज आहे.
मराठी सिनेमातील हिवाळ्यावर बेतलेले एक गाणं येथे आठवते.
” आला थंडीचा महिना,
झटपट शेकोटी पेटवा!
हिला लागलाय खोकला
मधाचं बोट कुणी चाखवा”
या गाण्यात शेकोटी कशी झटपट पेटवली जाते, याचे वर्णन आढळून येते.
काल रात्री हाॅस्पीटलच्या मागच्या रस्त्यावर सायंकाळची वाॅकिंग करताना ही शेकोटी दिसली.वातावरणात भरपूर थंडी जाणवत होती.परंतु भरभर चालण्यामूळे माझी थंडी भूर्र झालेली होती.तरीही ती शेकोटी पाहून क्षणभर मनात विचार आला, आपणही शेकोटीची उब घेऊ या!
त्या शेकोटीच्या भोवती अनोळखी माणसांचा गराडा पाहून तो बेत रद्द करून पुढे चालायला लागलो.
मला आमच्या गावाकडील हिवाळा व त्यावेळेसच्या शेकोट्यांची आठवण झाली.
भल्यापहाटेच बाबा आमच्या दुकानासमोर रस्त्याच्या कडेला उघड्यावर शेकोटी पेटवून थंडीचा बंदोबस्त करत असत.रस्त्यावरून येणाऱ्या जाणार्यांना आयतीच शेकोटी मिळत असे.
शेकोटीभोवती बसून नागपूर बिडी ओढण्याची फेरी चालायची.
शेकोटीच्या धूरासोबत, बिडीचा धूर व तोंडातून निघणारी वाफ वातावरणात मिसळून जात असे.एकाच वेळी रस्त्यावर अनेक शेकोट्या लावलेल्या असायच्या.
शेकोटीसोबतच एक गंमत असायची!
कुणीही येऊन शेकोटीची उब घेऊ शकत नसे.त्या व्यक्तीला सोबत ” सासु” आणून शेकोटीत आहुती देणे गरजेचे असायचे.
येथे सासु म्हणजे शेकोटीत टाकण्यात येणारे जळतन!
तुमची ” सासु” हजर केल्याशिवाय शेकोटीची उब तुम्ही घेऊ शकत नाही😊.
हे जळतन मिळवण्यासाठी काय काय भानगडी कराव्या लागायच्या!
अर्ध्या तासात शेकोटीच्या जाळातून निर्माण होणाऱ्या उष्णतेतून पायांच्या पिंढर्या गरम होत असत.शेकोटीतील जळतन संपत आलेले असायचे. शेकोटीला रामराम करून मंडळी कामधंद्यासाठी उठून जात असे.
एमडी करत असताना या शेकोटीमुळे पायांना होणाऱ्या त्वचारोगावर एक शोधनिबंध मी लिहिला होता.
कलकत्याच्या राष्ट्रीय त्वचारोगा परिषदेत तो शोधनिबंध मला सादर करायचा होता. १९८७ सालची ती आठवणही जागी झाली.
शेकोटीच्या अती उष्णतेपासून
” इरिदीमा अब इग्ने ” ( Erythema Ab Igne) नावाचा त्वचारोग उद्भवतो , हे त्या शोधनिबंधात दाखवून दिले होते.
शेकोटीतून निघणाऱ्या धुराने दुर्धर असे फुफ्फुसातील रोग देखील उद्भवतात.
काहीही असो, शेकोटी हा थंडी पळवण्यासाठी मानवाने केलेला हा एक
” जुगाड” असतो.
थंड हवामान असलेल्या प्रदेशात घराघरातून ” फायर प्लेस” दिसून येतात.
अतिश्रीमंत लोकांसाठी हा प्रकार निर्माण झालेला आहे.
रबर, रंगीत वस्तु व प्लास्टिक शेकोटीसाठी जळतन म्हणून वापरू नये , याची काळजी घेतली तर वायू प्रदुषण कमी होऊ शकते.
शेकोटी पुराण संपले😊🙏
डाॅ अच्युत बन
१९\१२\२०२४
Discussion about this post