उमरी ते हंगीरगा मार्गावर बस सेवा नसल्याने गावकरी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उमरी तालुक्यातील अब्दुल्लापूर वाडी, इज्जतगाव, मनूर, बोळसा, हंगीरगा या मार्गावर बस सेवा सुरू करावी, अशी मागणी या भागातील विद्यार्थी आणि नागरिकांनी केली आहे. भोकर आगाराची बस आणि बिलोली आगाराची बस या मार्गावर सुरू केल्यास या मार्गावरील नागरिकांची व्यवस्था होईल. विशेष म्हणजे हा ग्रामीण भाग अत्यंत दुर्लक्षित आहे. दळणवळणाचे साधन नसल्याने नागरिकांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत आर्थिक पिळवणूक होते. उमरी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या भागातील जवळपास १० ते १५ गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी उमरीला येतात. परंतु बस सेवा सुरू नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. या बाबीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी हंगीरगाचे सरपंच विजयमाला पवार यांनी केली आहे.दि. २३ जानेवारीपर्यंत बससेवा सुरु झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Discussion about this post