मायणी : प्रतिनिधी
खटाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी भुतेश्वर विद्यामंदिर अंबवडे येथील मुख्याध्यापक संजय जगताप यांची निवड करण्यात आली. वडूज येथील छ. शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या दालनात निवड प्रक्रिया पार पडली.
सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष संजय यादव, जिल्हा मुख्याध्यापक संघ कार्यकारिणी सदस्य रमेश देशमुख, अशोक देशमुख, जगन्नाथ जाधव या मान्यवरांच्या उपस्थितीत आज खटाव तालुका मुख्याध्यापक संघाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते संजय जगताप यांची निवड करण्यात आली. गेल्या २४ वर्षापासून दैनिक सकाळचे प्रतिनिधी म्हणूनही ते कार्यरत आहेत. जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष संजय यादव तसेच रमेश देशमुख, अशोक देशमुख, शशिकांत खैरमोडे या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शन व नेतृत्त्वाखाली खटाव तालुका मुख्याध्यापक संघाची कामगिरी उत्तम रीतीने पार पाडणार आहे. तालुक्यातील विविध शाळांचे प्रश्न, व शैक्षणिक समस्या याबाबत गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी यांचेशी समन्वय साधून मार्ग काढणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्याध्यापक संघाच्या मान्यवराच्या हस्ते संजय जगताप यांचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्याध्यापिका शैलजा माळी, प्रकाश शिंदे, जयवंत घार्गे, सदाशिव घाडगे, नंदकुमार पवार, विकास अडसुळे, जितेंद्र देशमुख, दत्तात्रय घाडगे आदी संघटनेचे शिलेदार उपस्थित होते. दरम्यान, मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सुरेंद्र गुदगे सचिव सुधाकर कुबेर संचालक एन व्ही कुबेर दिगंबर पिटके आदी मान्यवरांसह तालुक्यातील विविध शाखा शाळांच्या मुख्याध्यापकांनी जगताप यांचे अभिनंदन केले.
Discussion about this post