भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक प्रगल्भ आणि दूरदृष्टी असलेला नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, शंकरराव भेलके महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष कार्यक्रम आयोजित करून डॉ. सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली.
महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ तुषार शितोळे प्रा डॉ जगदीश शेवते, प्रा. महेश कोळपे, प्रा माऊली कोंडे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रा जाधवर डी एस डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकर्तृत्वावर तसेच भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदानाबद्दल प्रकाश टाकणारे भाषण केले आणि त्यांच्या योगदानाबद्दल आदर व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात मौन पाळून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणे सादर करून डॉ. सिंग यांचे शांत, सुसंस्कृत आणि विद्वत्तापूर्ण व्यक्तिमत्त्व उलगडले. “डॉ. मनमोहन सिंग यांचे प्रामाणिक नेतृत्व आणि आर्थिक सुधारणांमुळे भारताला जागतिक पातळीवर नवी ओळख मिळाली,” असे मत एका विद्यार्थ्याने व्यक्त केले. “त्यांचे विचार आणि योगदान नेहमीच प्रेरणा देत राहतील,” असे डॉ . एस जी घाडगे यांनी सांगितले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी माजी पंतप्रधानांविषयीचा आदर व्यक्त करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
Discussion about this post