लग्नसमारंभातील प्रचंड उधळपट्टी, त्यातील धांगडधिंगा आणि घटस्फोटाचे प्रमाणही वाढत असताना कोल्हापुरातील ‘बालकल्याण संकुला’तील मुलींचे मात्र आतापर्यंत मागील ४० वर्षांत सर्वच्या सर्व ७४ लेकींचे विवाह कमालीचे यशस्वी झाले आहेत. त्यांनी कधीही कुंडली पाहिलेली नाही. हुंड्याचा तर प्रश्नच नाही. मुलीने मुलगा पसंत केल्याशिवाय पुढे जायचे नाही. आणि दोघांच्याही ‘एचआयव्ही’पासून सर्व वैद्यकीय चाचण्या केल्याशिवाय लग्नच ठरवायचे नाही, अशी तिथे पद्धत आहे. ती समाजाला पुढे नेणारी आहे. कुंडली पाहिल्याशिवाय बायोडाटाच हातात घ्यायचा नाही, या बुरसटलेल्या मानसिकतेच्या पालकांच्या डोळ्यांत अंजन घालणारी ही विवाहपद्धती आहे. समाजानेही तिचे अनुकरण करण्याची गरज आहे.कोल्हापुरातील ‘बालकल्याण संकुल’ ही अनाथ, निराधार, एकल पालक, समाजाने टाकून दिलेल्या मुला-मुलींचे मायेचे घर आहे. ही संस्था मुलींना अगोदर उत्तम शिक्षण देते आणि त्यांचे विवाहाने पुनर्वसन करते. संस्थेतील पहिला विवाह १३ जून १९८५ ला झाला आहे. आता प्रत्येक वर्षी सरासरी एक विवाह सोहळा होतो. लहान वयातच मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढल्याने विवाहासाठी संस्थेत फारशा मुली उपलब्ध नाहीत. पूर्वी गावभर फिरून कुठेच मुलगी मिळाली नाही की, लोक ‘बालकल्याण’मध्ये यायचे.आता दिवसाला सरासरी २० बायोडाटा मुलींसाठी येतात. त्यातील चांगले निवडून मुलाची पसंती केली जाते. त्यातही मुलीने मुलगा पसंत केल्याशिवाय कोणतीच गोष्ट केली जात नाही. मुलगा पसंत केल्यावर मुलीला घेऊन मुलाचे गाव, परिसर, त्याचे घर आणि कुटुंबातील माणसे स्वत: मुलगी पाहून येते. तिला विचार करण्यासाठी वेळ दिला जातो. तिला ते आवडले तरच लग्न पुढे जाते. मुलीच्या आयुष्यात लग्नानंतर फरपट येऊ नये, यासाठी संस्था सर्व पातळीवर दक्षता घेते
Discussion about this post