
. लोणार ता प्र :-सुनिल वर्मा
लोणार शहरातील (गायमुख) धार परिसराला लागुनच असलेला वीरशैव लिंगायत समाजाचा पलसिध्द मठ संस्थानमध्ये पूजापाठ व धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी करून पुरातत्व विभागाने अधिग्रहीत केलेल्या मठ संस्थानास गांजर गवताचे स्वरूप येवून दूरावस्था केल्याने अखेर समाज बांधवांनी पलसिद्ध मठ संस्थानची साफसफाई करून पूजापाठ करण्यासाठी कुठल्याही प्रकारची समाज बांधवांना बंदी न घालता इतर सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी पर्यायी दुसरी जागा उपलब्ध करून द्या या मागणीचे निवेदन महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेचे उपाध्यक्ष महेश शेटे यांच्या प्रमुख उपस्थीतीत आज दिनांक ०३ जानेवारी २०२५ रोजी नरेंद्रजी मोदी पंतप्रधान यांना तहसीलदार मार्फत दिले असुन निवेदन प्रत नगर परिषद, पुरातत्व विभाग, पोलीस स्टेशन सह इतर वरिष्ठ कार्यालयास दिल्या आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जागतिक कीर्ती प्राप्त पर्यटन नगरी लोणार शहरातील धारातीर्थच्या शेजारी वीरशैव लिंगायत समाज बांधव यांचे पुरातन पलसिद्ध मठ संस्थान असुन या जागेत जगदगुरु दारुकाचार्य व महादेव मंदिर व साधू संताची समाधी तसेच समाजाचे गुरु यांना राहण्यासाठी खोल्या बांधकाम केलेल्या आहेत. सदरील मठामध्ये गुरु दीक्षा व इतर धार्मिक कार्यक्रम होत होते परंतु गेल्या अंदाजे ७ ते ८ वर्षापूर्वी सदरील मठाची जागा धारतीर्थास लागुन असल्याने पुरातत्व विभागाने धारातीर्थ क्षेत्रास तारकुंपण करतांना लिंगायत समाजाच्या मठाची जागा सुद्धा तारकुंपण करून धारतीर्थ परिसरात घेवुन समाज बांधवांना धार्मिक कार्यक्रम, पूजा पाठ करण्यास बंदी घातली आहे. परंतु लिंगायत समाज हा शांतप्रिय समाज असल्याने स्थानिक लोक प्रतिनिधी, प्रशासन व पुरातत्व विभाग अधिग्रहीत केलेल्या जागेबाबत योग्य निर्णय घेवून समाज बांधवाना नियमित पूजा पाठ करू देवून धार्मिक कार्यक्रमासाठी इतरत्र पर्यायी जागा देईल अशी आशा होती. परंतु तसे तर झालेच नाही याउलट पुरातत्व मठाची जागा अधिग्रहीत करून सदरील जागेमध्ये मंदिर व समाधी असल्याचे दिसतांना सुद्धा सदरील मठाची जागेकडे दुर्लक्ष करून फक्त पुरातत्व विभागाने जागा ताब्यात घेवून धर्मानुसार आचरण करण्याचा लिंगायत समाजाचा धार्मिक स्वातंत्र हा मुलभुत हक्क हिरावुन घेतला आहे. त्यामुळे समाजातील महिला-पुरूषांमध्ये पुरातत्व विभागा विषयी प्रचंड रोष निर्माण झाला असुन मठ संस्थान मधील मंदिर व समाधी समोर गांजर गवत व घाणीचे साम्राज्य गेल्या कित्येक वर्षा पासून दिसत असल्याने अखेर शांतप्रिय लिंगायत समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखल्याने आज रोजी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदना नुसार धारातीर्थच्या उत्तर बाजूला लागून असलेल्या लिंगायत समाजाच्या पलसिद्ध मठ संस्थानाची झालेली दुरावस्था नीट करून साफसफाई करून तसेच सदरील जागेचे सुशोभिकरण पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात येवून मठात पूजापाठ करण्यास समाज बांधवांना न अडविता धार्मिक कार्यक्रम व गुरुवर्य यांना राहण्यासाठी या जागेच्या मोबदल्यात इतरत्र पर्यायी जागा संदर्भात पुरातत्व विभागाने शासनास कळवून लिंगायत समाज बांधवांवर केलेला हा अन्याय दूर करावा शांतप्रिय लिंगायत समाजास आंदोलने करण्याची वेळ येवू देवू नये अशी माहिती यावेळी महेश शेटे यांनी दिली निवेदन देते वेळी मंगेश शेटे, रवि भोजपत्रे, प्रशांत भूक्कन, भुषण शेटे, शिवलिंग मिटकरी, कमलेश शेटे, किशोर सोसे, शुभम बेंद्रे, विवेक राजूरकर सह इतर समाज बांधव आवर्जून उपस्थित होते.


Discussion about this post