सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास दि. 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org किंवा MahaIT या पोर्टलवरती त्वरित अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. 13 जून 2018 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन भत्ता 25 हजार रूपये, निवास भत्ता 12 हजार रूपये तसेच निर्वाह भत्ता 6 हजार रूपये असे एकूण प्रति विद्यार्थी 43 हजार रूपये रक्कम तसेच वैद्यकिय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 5 हजार रूपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रूपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते.
शैक्षणिक संस्थांमध्ये काही अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरु असल्याने सन 2024-25 मधील पात्र विद्यार्थ्यांना दि. 31 डिसेंबर 2024 अखेर अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थी संघटना व पालक यांनी अर्ज करण्यास मुदतवाढ मिळण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास मागणी केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन अर्ज करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे श्री. उबाळे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
Discussion about this post