महाराष्ट्रात आढळले १७० जीबीएस रुग्ण
गोंडपिपरी:गुयले बेन सिंड्रोम च्या
(जीबीएस) रुग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या १७० वर पोहोचली आहे. जीबीएसच्या ६१ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यभरात ६२ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाने जीबीएस उद्रेक झालेल्या परिसरातील पाणी आणि चिकनच्या नमुन्यांच्या तपासणीवर भर दिला आहे. राज्यात पुणे विभागात जीबीएसचे सर्वाधिक १६२ रुग्ण आहेत. त्यात पुणे महापालिका ३३, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेली गावे ८६, पिंपरी-चिंचवड महापालिका २२, पुणे ग्रामीण २१ आणि इतर जिल्ह्यातील ८ रुग्ण आहेत. आतापर्यंत जीबीएसमुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. शहराच्या विविध भागांतील १७३ पाणी नमुने
रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यातील ३३ पाणी नमुने पिण्यास अयोग्य आढळले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. महापालिकेकडून नांदेडगाव परिसरातील चिकनचे १८२ नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान सस्थत (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत. याचबरोबर अन्न औषध व प्रशासनाने नांदेड गाव परिसरातील हॉटेलमधून खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले आहेत. याचबरोबर रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागात आरोग्य विभागाकडून रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. पुणे महापालिकेने ५४ हजार ३४ घरांचे सर्वेक्षण केले असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेने १९ हजार २३२ आणि पुणे ग्रामीणने १३ हजार ८९ अशा एकूण ७७ हजार ३५५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
Discussion about this post