
पोखरापूर दि.13
नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या संपादित क्षेत्रात पोखरापूर येथील श्री.जगदंबा माता मंदिर व माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळेच्या वर्ग खोल्या व क्रीडांगण विकसित केलेल्या जमीनीच्या समावेश असल्याने पोखरापूर येथील श्री.जगदंबा माता मंदिर व शाळेला शक्तिपीठ महामार्गाचा दुहेरी धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे
या ठिकाणी महामार्गासाठी पुनर्सरेखन करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे देवस्थानाचे अध्यक्ष नंदकुमार कदम यांनी केली आहे.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून उभारणी करण्यात येत असलेला नियोजित नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्ग मोहोळ तालुक्यातील पोखरापूर गावालगत व नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेलगत गेल्याने तसेच श्री.जगदंबा माता मंदिर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा इमारतीतला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग( पालखी मार्ग) क्र. ९६५ च्या संपादित क्षेत्रात श्री.जगदंबा माता मंदिर गेल्याने देवस्थान ट्रस्टचे वतीने कोर्टात धाव घेतली होती, मा. उच्च न्यायालयात मुंबई यांचे आदेशानुसार पुरातत्व खात्याचे नियंत्रणखाली गट नं. १२५/२/ब मधील उर्वरित जागेत श्री.जगदंबा माता मंदिराचे पुनर्रोपन बांधकाम सुरू केले आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग आखण्यात आला आहे.त्याचे सर्वेक्षण मे. मोनार्क सर्व्हेअर अँड इंजिनीअरिंग कन्सल्टन्सी प्रा. लि. पुणे यांनी केले आहे. भारत सरकारच्या राजपत्रात नमुद केलेल्या मार्गदर्शक सूचना नियम व अटींचे पालन सर्व्हेक्षण करताना कंपनीने केलेले नाही. राजपत्रातानुसार देवस्थान मंदिरे, शाळा, प्रार्थना स्थळे,क्रिडांगण, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जलस्रोत-विहीरी,तलाव, बागायती जमिनी इत्यादी बाबीं वगळण्यात याव्यात असे स्पष्टपणे नमुद केले आहे. परंतु याचा अजिबात विचार न करता आखणी केली आहे. ही बाब हिंदू देव-देवतांची मंदीरे संपुष्टात आणण्याचा डाव असल्याची आरोप होत आहे.याबाबत हरकत नोंदविण्यात आली आहे. येथील जगदंबा विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजची संपूर्ण इमारत बांधकाम व क्रिडांगण संपादित क्षेत्रात आले आहे. त्यामुळे श्री.जगदंबा माता मंदिर पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. पोखरापूर व परिसरातील नागरिकांनी शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध केला आहे. ग्रामपंचायत पोखरापूर यांच्या वतीने आक्षेप नोंदवला असून श्री.जगदंबा माता मंदिर व माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळा सुरक्षित ठेवूनच गटनंबरच्या किमान ५०० मीटर अंतराच्या बाहेरून शक्तीपीठ महामार्गासाठी पुनर्सरेखन करण्याची मागणी देवस्थान ट्रस्टचेवतीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे केली आहे.
हिंदूत्वादी सरकारने भारतीय राष्ट्रीय महामार्गात व शक्तिपीठ महामार्गात संपादित क्षेत्रात येणारी हिंदू देव-देवतांची मंदीरे सुरक्षित ठेवावी. शक्तिपीठ महामार्ग करताना पोखरापूरचे आराध्य दैवत श्री.जगदंबा मातेचे मंदिर सुरक्षित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना तातडीने पुनर्सरेखन करण्याचे आदेश द्यावेत – श्रीधर उन्हाळे,मुख्य विश्वस्त..
Discussion about this post