शिरूर तालुका प्रतिनिधी:
मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळविताना अडचणी येत असल्याने तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची मागणी शिरूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे करण्यात आली आहे.
राज्यातील मराठा समाजासाठी कुणबी दाखल्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिंदे समितीला मुदतवाढ दिली असली, तरी नागरिकांना विविध कागदपत्रे सादर करावी लागत असल्याने प्रक्रिया किचकट ठरत आहे. या प्रक्रियेस गती मिळावी व नागरिकांची गैरसोय टळावी, यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करून आवश्यक कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनावर सुनील जाधव, रूपेश घाडगे, स्वप्निल रेड्डी, उमेश शेळके,महेंद्र येवले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र सहज आणि जलद मिळावे, यासाठी हा स्वतंत्र कक्ष आवश्यक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
स्वतंत्र कक्षामुळे नागरिकांची होणार सोय
हा स्वतंत्र कक्ष सुरू झाल्यास मराठा समाजातील नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी धावपळ करावी लागणार नाही. तसेच, प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल. त्यामुळे शासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Discussion about this post