आजरा शहरातील भारत नगर वसाहती मधील पायाभूत सुविधांसाठी 3 मार्च रोजी संघर्ष मोर्चा काढणार..
मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत
आजरा: प्रतिनिधी,
नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या भारतनगरमध्ये गेली 20ते 22वर्षापासून पायाभूत सुविधांचा आकाल पडला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा,विकास आणि सुधारणा ताबडतोब झाल्या पाहिजेत.तसेच इतर मागण्यांबाबत ताबडतोब कार्यवाही व अंमलबजावणी झाली पाहिजे.या संदर्भात ताबडतोब निर्णय घेऊन अंमलबजावणी केली नाही. तर सोमवार दिनांक 3 मार्च 2025 रोजी “संघर्ष मोर्चा” काढून आंदोलन करणार असलेबाबत निवेदन मुख्याधिकारी नगरपंचायत,उपाभियंता सर्वजनिक बांधकाम विभाग व तहसीलदार आजरा यांना देण्यात आले.
आजपर्यंत भारतनगर मधील रहिवाश्यानी आपल्या मूलभूत सुविधा पूरवण्याबाबत अनेकवेळा वेगवेगळे तक्रार अर्ज दिलेले आहेत. मात्र याची दखल घेतली गेलेली नाही.या विषयासंदर्भात आणि मागण्या संदर्भात म्हणणे आज निवेदनाद्वारे तहसीलदार आजरा ,मुख्याधिकारी नगरपंचायत आजरा, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आजरा व उपअभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मर्यादित कंपनी आजरा यांना दिले आहे. तसेच प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी गारगोटी यांनाही निवेदन देऊन आपल्या समस्या मांडलेल्या आहेत
या निवेदनात म्हटले आहे कि,आजरा शहरातील भारतनगर सन-1997 पासून वसाहत म्हणून अस्तित्वात आहे.तरी या वसाहतीला पायाभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. नगरपंचायत झाल्यानंतर नुसती आश्वासने देऊन लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केलेली आहेत.मात्र त्यावर ठोस भूमिका घेऊन अंमलबजावणीची कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही.
महाराष्ट्र नगरपरिषद कायद्या नुसार खालील कलमांच्या आधारे शहरांमधील वेगवेगळ्या व पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी नगरपंचायतची आहे त्यामुळे भारत नगर मधील लोकांच्यासाठी पायाभूत सुविधांची ठोस अंमलबजावणी करणे नगरपंचायतीची नैतिक जबाबदारी आहे.
भारतीय संविधानाच्या कलम 243W (Article 243W) मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकार आणि कर्तव्यांबद्दल सांगितले आहे. या कलमांद्वारे नगरपंचायतींना स्थानिक पातळीवर विविध सेवांचा पुरवठा करणे आवश्यक आहे, ज्यात सांडपाणी, गटारी, रस्ता इ.व्यवस्थापनाबाबत देखील समाविष्ट आहे.
नगरपंचायतीच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास आणि सुधारणा अत्यंत आवश्यक ठरल्या आहेत. या भागात काही महत्त्वाच्या सुविधांचा अभाव आहे ज्यामुळे लोकांचे जीवन प्रतिकूल होत आहे. या संदर्भात भारत नगर मधील लोकांनी या अगोदरही निवेदने दिलेली आहेत. आता मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली खालील मागण्या करण्यात येत आहेत.
1)आजरा नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या भारतनगर भागात पायाभूत सुविधांचा विकास आणि सुधारणा ताबडतोब मिळाल्या पाहिजेत….!
2) भारतनगर मधील सर्व भागामध्ये सगळीकडे रस्ते करावेत
3) भारतनगरमध्ये गटारीच्या सुविधा करून सांडपाण्याची सुयोग्य व्यवस्था करून पाण्याचा योग्य निचरा करावा
4) भारत नगरच्या ओपन स्पेस मधील लहान मुलांसाठी अंगणवाडी बांधावी
5)भारत नगर मध्यील ओपन स्पेस मध्ये मुलांना खेळण्यासाठी बगीचा तयार करावा
6) भारत नगर मध्ये रस्त्यावर दिवाबत्तीची सोय ताबडतोब करावी
7) भारत नगर मध्ये झालेल्या कामांची यादी व सुरू असलेल्या कामांची यादी आणि सुरू करणाऱ्या कामांची यादी व त्या संदर्भातील कागदपत्रे संघटनेला मिळावी.
यासंदर्भात प्रशासनाने ठोस गांभीर्यपूर्वक पाय उचलली पाहिजेत. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून आजरा शहरातील भारत नगर मधील वसाहतीत राहणाऱ्या लोकांना न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
असे झाले नाही तर मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने सोमवार दिनांक 3 मार्च 2025 रोजी “संघर्ष मोर्चा” काढून आंदोलन करणार असलेबाबत इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देताना मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत, जिल्हा संघटक समीर खेडेकर(सर )तालुका संघटक मजीद मुल्ला व भारत नगर मधील अब्दुलवाहिद सोनेखान, सलीम शेख(सर ), तोफिक माणगावकर, सल्लाउद्दीन शेख, खुदबूद्दीन तगारे, गुलाब शिकलगार, यासीन सय्यद(सर ), सलीम नाईकवडे, मुदस्सर इंचनाळकर, नईम नाईकवडे, शौकत पठाण,आसिफ मुराद, सलीम ढालाईत, रहुफ नसरदी, सल्लाउद्दीन नसरदी, मोईन शेख, मुबारक नसरदी, आसिफ काकतीकर, पापा लतीफ, मोहम्मद नसरदी, फहीम नसरदी, रहीम लतीफ, रशीद लाडजी मुफीद काकतीकर व भारत नगर मधील रहिवासी व मुक्ती संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post