महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी; प्राजक्ता माळी सादर करणार ‘शिवार्पणमस्तु’.
त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar
आज (बुधवारी) महाशिवरात्री असल्याने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे भाविकांची पहाटेपासून मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासह देवस्थान ट्रस्टकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. तर त्र्यंबकेश्वर शहरात काल रात्रीपासूनच बाहेरील राज्यांसह महाराष्ट्रातील भाविक दर्शनासाठी दाखल झाल्याने त्र्यंबकनगरी गर्दीने गजबजून गेली आहे. तसेच जागोजागी पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने (Trimbakeshwar Devasthan Trust) महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर दोन दिवस २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी (दि.२६ फेब्रुवारी २०२५ ) रोजी पहाटे चार वाजेपासून ते (दि. २७ फेब्रुवारी २०२५) रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर २४ तास खुले राहणार आहे.
दुसरीकडे भाविकांची त्र्यंबकराजांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी (Crowd) लक्षात घेता, कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रकारचे व्हिआयपी प्रोटोकॉल व गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे आज (दि. २६ फेब्रुवारी) रोजी देणगी दर्शन देखील संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात आले आहे.
महाशिवरात्री निमित्त ट्रस्टची जय्यत तयारी :
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार इत्यादी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘शिवार्पणमस्तु‘ नृत्य सादर करणार :
महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या शिवार्पणमस्तु नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, प्राजक्ता माळीच्या या कार्यक्रमाला त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध केला असून त्यांनी ग्रामीण पोलिसांना याबाबत पत्र लिहिले आहे. पंरतु, तरीही त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून प्राजक्ता माळीचा कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे..
Discussion about this post