त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रमाबाबत अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतला मोठा निर्णय; म्हणाली, “माझ्यामुळे…”
महाशिवरात्रीनिमित्त (Maha Shivratri 2025) देशभरातली शिवमंदिरे पहाटेपासूनच भक्तांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे देवस्थान ट्रस्टकडून (Trimbakeshwar Devasthan Trust) मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ‘शिवार्पणमस्तु’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंरतु, या कार्यक्रमाला त्र्यंबकराज मंदिर देवस्थान ट्रस्टच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे (Lalita Shinde) यांनी ‘सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही’, असे पत्र ग्रामीण पोलिसांना लिहित विरोध केला होता. यानंतर प्राजक्ता माळीने याप्रकरणावर स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर सर्व कार्यक्रम नियोजनानुसारच होणार असल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले होते. अशातच आता या कार्यक्रमाबाबत अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत मोठा निर्णय घेतला आहे.
प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) व्हिडीओमध्ये म्हटले की, “त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारा ‘शिवार्पणमस्तु’ हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला फार प्रसिद्धी द्यायची नाही असं ठरलं होतं. कारण मंदिराचं प्रांगण, तिथलं क्षेत्रफळ, तिथे किती माणसं पाहण्यासाठी बसू शकतात, या सर्व गोष्टी पाहता, मीसुद्धा सोशल मीडियावर या कार्यक्रमाबाबत अजिबात माहिती दिली नव्हती. पण, काल दिवसभरात या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली, त्यामुळे आता अवास्तव गर्दीची भिती, काळजी प्रशासनाच्या मनात आहे आणि त्यामुळेच मी माझ्या कुटुंबीयांशी बोलून हा निर्णय घेतला आहे की, माझ्याशिवाय कार्यक्रम होईल, कमिटमेंट आहे, त्यामुळे कार्यक्रम होईल. पण मी कार्यक्रमात परफॉर्म करणार नाही. माझे सहकलाकार परफॉर्म करतील. अर्थातच यामुळे माझ्या आनंदावर विरझण पडणार आहे”, असे तिने सांगितले.
पुढे बोलतांना प्राजक्ता माळी म्हणाली की,” वैयक्तिक सुखापेक्षा आपल्यामुळे प्रशासनावर ताण येऊ नये, त्यामुळे ही बाब मला आपल्यापेक्षा मोठी वाटते. अर्थातच जिथे भाव असतो, तिथे देव असतो. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी कुठेही बसून शिवाची आराधना केली, तरी शिवापर्यंत ती पोहोचेल. तिथे कुणाचाही हिरमोड होऊ नये आणि कुणाच्याही मनात, कसलीही शंका उपस्थित होऊ नये म्हणून केवळ माहितीकरता (Information) मी हा व्हिडीओ बनवतं आहे”, असंही तिने म्हटले आहे.
माजी विश्वस्तांनी केला होता विरोध :
प्राजक्ता माळीच्या ‘शिवार्पणमस्तु’ या नृत्याच्या कार्यक्रमाला माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी आक्षेप घेत विरोध केला होता. या वादाच्या संदर्भात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या छत्रपती संभाजीनगर मंडलाच्या अधीक्षकांनीही ट्रस्टच्या अध्यक्षांना पत्र देऊन अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याची अनुमती घेणं आवश्यक असल्याचे म्हटले होते. अशा प्रकारे विनापरवानगी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणं हे एएमएएसआर कायदा, १९५८ व त्याचे नियम,१९५९ चं उल्लंघन असल्याचे पत्रात नमूद केले होत..
Discussion about this post