तुगांवच्या जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना आहार व आरोग्य विषयक मार्गदर्शन
शशिकांत भुतेकर
(धाराशिव तालुका प्रतिनिधी)
ढोकी :- धाराशिव तालुक्यातील तुगांव येथे विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानार्जनाबरोबरच आहार व आरोग्य विषयक शास्त्रशुद्ध माहिती मिळणे हे नितांत गरजेचे असते.हेच ओळखून तुगाव येथील सुजाण नागरिक व सध्या छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असलेले व आयुर्वेदामध्ये M.D.(बाल आरोग्य तज्ज्ञ) केलेले डॉ. सुहास धनाजी वीर यांनी आपल्याच गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य आहार व आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.त्यांनी आपल्या माहिती व मार्गदर्शनपर तसेच प्रात्यक्षिकांसह अभ्यासपूर्ण केलेल्या भाषणातून खालील बाबींवर प्रकाश टाकला.
बालकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असावा.?
तो आहार किती प्रमाणात घ्यावा?
याबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य विषयक चांगल्या सवयी त्याचा आपल्या जीवनावर होणारा दुरगामी परिणाम याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
तसेच निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात विविध औषधी वनस्पती उपलब्ध आहेत. त्यापैकी कांही वनस्पती आपल्या परिसरात सहज उपलब्ध आहेत.तर काही जंगलामध्ये उपलब्ध आहेत.त्याचा आपल्या जीवनासाठी अनमोल अशा प्रकारे फायदा होत असतो. यामध्ये वासनवेल,गुळवेल, अडुळसा,तरवड, तुळस,गवती चहा,कोरफड इत्यादी.
प्राचीन काळापासून मानव वनस्पतींचा वापर आरोग्य संरक्षण व संवर्धनासाठी करीत आला आहे. वनस्पतींचे औषधी गुणधर्म उपयोग वैदिक काळात (इ.स.पू.२५०० ते ६५०) ऋषिमुनींनी व अभ्यासकांनी विविध ग्रंथांतून लिहून ठेवले आहेत.आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचा उदय व विकास भारत देशात झाला चरक,सुश्रुत काश्यप,वाग्भट आदि आयुर्वेद संहितेमध्ये विविध औषधी वनस्पतींचे उपयोग यांची माहिती आढळते. वनस्पती द्रव्यांचे गुणधर्म व उपयोग यांचे वर्णन असलेल्या निघंटु ग्रंथामध्ये औषधी द्रव्यांचे गुणधर्म विस्ताराने मांडले आहेत.याबाबत डॉ.सुहास वीर यांनी अनमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रमोद अनपट व प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.राजेंद्र सुभाष डोंगरे हे आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहशिक्षक श्री. शिवदास चौगुले यांनी केले. उपस्थितांचे आभार श्री. दत्तात्रय पडवळ यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री.बाहुबली नवले,सुलभकुमार भगत, नवनाथ बचाटे,अमोल वैद्य, नामदेव डुकरे तसेच गावातील होतकरू युवक प्रतीक लोमटे यांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post