
प्रा.दिलीप नाईकवाड,
सिंदखेडराजा : तालुका प्रतिनिधी..
स्थानिक श्री व्यंकटेश कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त राज्यस्तरीय पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा उत्साहात पार पडली. विज्ञान विद्याशाखा व आय.क्यू.ए. सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली.
याप्रसंगी जे.ई.एस. महाविद्यालय जालना येथील प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे होते.
उदघाटक म्हणून वाणिज्य विभागप्रमुख डॉ. नरेंद्र शेगोकार होते.
पदार्थविज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरविंद कानवटे यांनी प्रास्ताविक केले. या स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयातून एकूण 70 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी बुलढाणा येथील जिजामाता महाविद्यालयाचे विद्यार्थी गोपाळ इंगळे आणि शैलेश साजगुरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी कु. आयेशा शेख व प्रांजल खरात यांनी द्वितीय पारितोषिक विभागून मिळविले .खामगाव येथील गो. से. महाविद्यालयाचा शिवम खराटे याने तृतीय, तर लोणार येथील बनमेरू महाविद्यालयाची विद्यार्थिनी शुभ्रा वाटोरे व मेहकर येथील श्रीमती सिंधुताई जाधव महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी डोईफोडे यांनी प्रोत्साहनपर पारितोषिक विभागून मिळविले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना देखील याप्रसंगी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. गणेश अग्निहोत्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे विद्यार्थी म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जीवनात यश प्राप्त करावे,
असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून आपली प्रगती करावी असा सल्ला दिला. परीक्षक म्हणून डॉ. गणेश पुंड, प्रा. मनोज बाभळे व प्रा. पवन कदम यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुनंदा कुहिरे हिने केले. कु. माधवी खैरे हिने आभार मानले. या स्पर्धेसाठी प्राचार्य डॉ. डी. व्ही. गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व विज्ञान विद्याशाखा प्रमुख, इतर प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.
……………
Discussion about this post