सध्या महापालिका क्षेत्रामधील बहुचर्चित घरपट्टी वाढीबाबत नागरिकांमधून आणि व्यापारी वर्गातून प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजीची भावना आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या सभागृहामध्ये आयुक्त शुभम गुप्ता यांनी या संदर्भात सर्वपक्षीय बैठकही बोलावली मात्र या बैठकीमध्ये माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागले होते. आता प्रशासनाने नागरिकांमध्ये सध्या घरपट्टी नोटिसां बाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने आणि नागरिकांशी थेट संवाद साधण्याच्या दृष्टीने ‘कर संवाद’ हा अभिनव उपक्रम सुरु करण्याचे ठरवले आहे नागरिकांच्या मनातील सर्व प्रश्नांना आयुक्त शुभम गुप्ता यांनी उत्तरे दिली जात आहेत साधारणपणे नागरिकांच्या मनातील प्रश्न ..
१) आपण घरपट्टीमध्ये खूप वाढ केली आहे, हे खरे आहे का? उत्तरः नाही, महानगरपालिकेने घरपट्टीमध्ये कोणत्याही प्रकाराची वाढ केलेली नाही. महानगरपालिकेच्या १९९८ च्या सर्वसाधारण सभेमध्ये ठरावाद्वारे जे दर निश्चित करण्यात आले होते, त्याच दराने कर आकारणी केली जात आहे. यामध्ये कोणत्याही कर किंवा दरामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. २) बांधकामामध्ये मी कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही, तरीही घरपट्टीमध्ये वाढ झाली आहे, ती कशी?
उत्तरः i) वापरात बदल : ज्या मालमत्तेच्या वापरात बदल झाला आहे (जसे, रहिवासी मालमत्ता वाणिज्य वापरात आली किंवा त्यात भाडेकरूची नोंद केली गेली असेल तर).
ii) बांधकाम प्रकारात बदल ज्या मालमत्तेतील कच्चे बांधकाम पक्के बांधकाम झाले आहे.
iii) जलनिःसारण कर ज्या मालमत्तांना पूर्वी जलनिःसारण कर नव्हता, त्या मालमत्तांना हा कर लागू करण्यात आलेला आहे.
iv) उपयोगकर्ता शुल्क : वापरात बदल झाल्यामुळे शुल्कांच्या स्लॅबमध्ये बदल होतो, तसेच, प्रत्येक वर्षी ५% वाढ होते.
प्रश्न ३) कर लावण्याचे आणि वगळण्याचे अधिकार महानगरपालिकेला आहेत का?
उत्तरः सध्याच्या कर संरचनेनुसार सर्व कर राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि कराधान नियमानुसार लावले जातात. त्यामुळे, कर कमी किंवा वगळण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्तांना नाहीत. हे अधिकार फक्त शासनाकडे आहेत.
प्रश्न ४) माझी मालमत्ता २०१३ पूर्वीची आहे. माझ्या क्षेत्रात कोणतीही वाढ झालेली नाही किंवा वापरात बदल झालेला नाही, तरीही माझी घरपट्टी वाढलेली आहे, ती कशी?
उत्तरः जरी आपण आपले मिळकत क्षेत्र वाढवले नसले, तरी सन २०१३ पूर्वी संडास, बाथरुम, पॅसेज, गॅलरी इत्यादी क्षेत्र करात समाविष्ट केले जात नव्हते. परंतु, सन २०१३ पासून नवीन आकारणीत या क्षेत्रांना समाविष्ट करण्यास सुरुवात केली गेली आहे. त्यामुळे, २०१३ पूर्वीच्या कर आकारणीच्या क्षेत्रांमध्ये वाढ झालेली आहे.
प्रश्न ५) मला आलेल्या नोटीसमध्ये मालमत्ता धारकाच्या नावात चूक आहे. ती दुरुस्त करून मिळेल का?
उत्तरः आपल्याद्वारे दिलेल्या कागदपत्रांच्या आधारावर, आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादीमध्ये बदल असल्यास, सर्व बाची तात्काळ दुरुस्त करून दिल्या जातील.
प्रश्न ६) सुरुवातीला माझे जुने बांधकाम होते. आता मी बांधकामात वाढ केली आहे. तर मला घरपट्टीची आकारणी कशी होईल?
उत्तरः तुमच्या जुन्या बांधकामाची नोंद महानगरपालिकेत आहे. वाढलेली घरपट्टी ही जुने बांधकाम आणि वाढीव बांधकाम एकत्रितपणे आकारली जाईल. जुन्या बांधकामाची घरपट्टी आचीच आकारली गेली आहे.
प्रश्न ७) महानगरपालिकेने पूर्वीच्या झोनमध्ये बदल केले आहेत का?
उत्तरः पूर्वीच्या झोनमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.
प्रश्न ८) महानगरपालिकेने भाडेकरू वापराची आकारणी कशी केली आहे?
उत्तरः महानगरपालिकेने झोननुसार मंजूर केलेल्या दर पत्रकानुसार, निवासी भाडेकरूंची आकारणी दुप्पट दराने केली जाते. तसेच, बिगर निवासी भाडेकरू वापर असलेल्या मालमत्तांवर दरमहा भाडे करारानुसार कराची आकारणी केली जाते,
प्रश्न ९) महानगरपालिका क्षेत्रामधील इमारतींना कशाप्रकारे कराची आकारणी केली जाते?
उत्तरः महानगरपालिका क्षेत्रातील इमारतींना, महानगरपालिकेने झोननुसार मंजूर केलेल्या दरानुसार, इमारतीच्या प्रकारानुसार तसेच इमारतीच्या वयानुसार कराची आकारणी केली जाते.
प्रश्न १०) घरपट्टी बिलामधील कोणकोणत्या करांमध्ये सूट दिली जाते?
उत्तरः1) आर्थिक वर्षाच्या बिलामध्ये सौर ऊर्जा, गांडूळ खत, रेन वॉटर हार्वेस्टिंग, होम कंपोस्टिंग, सांडपाण्याचा निचरा यापैकी तीन कामांची पूर्तता केल्यास किंवा पंचतारांकित घर असल्यास सामान्य करात ४% सवलत दिली जाते.
ii) मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक, त्यांची विधवा पत्नी तसेच शौर्य पदक विजेते यांना मालमत्ता करामध्ये सूट दिली जाते.
iii) मिळकत वर्षभर बंद असेल, तर मिळकत बंद असलेबाबतचा अर्ज एप्रिल महिन्यात सादर केल्यास सामान्य करात २/३ सवलत दिली जाते.
iv) १ एप्रिल ते ३० जून पर्यंत घरपट्टीची पूर्ण रक्कम भरणाऱ्याला सामान्य करात १०% सवलत दिली जाते
Discussion about this post