अहो आमदार साहेब हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिक विमा नुकसान भरपाईच्या निधीचा प्रश्न तेवढा मार्गी लावा
पिक विमा निधी न मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत
हिमायतनगर (नितीन राठोड कांडलीकर ) – भारत हा कृषिप्रधान देश असूनही शेतकऱ्यांपर्यंत ज्या योजना पोहोचायला पाहिजे त्या योजना मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. पोहोचल्या तर त्याचा निधी वरच हडप केला जातो नाहीतर तो निधी अडवून धरला जातो. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.याचे जिवंत उदाहरण हिमायतनगर तालुक्यात पहावयास मिळत आहे.हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना सन २०२२ ते २४ मधील सोयाबीन,कापूस व हरभरा पिकाच्या विम्याची नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही.
हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांवर पिक विम्याची नुकसान भरपाई अद्यापही न मिळाल्यामुळे तो प्रचंड अडचणीत सापडला आहे.याविषयी काही शेतकऱ्यांनी एकत्र येतं तहसीलदार साहेब हिमायतनगर यांना निवेदन देऊन २०२२-२३ ते २४ सोयाबीन, कापूस व हरभरा पिक विमा नुकसान भरपाई मिळून देण्याबाबत मागणी केली आहे. या बाबीकडे कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नाही. पिक विमा मिळावा यासाठी पाठपुरावा करायलाही त्यांना वेळ नाही.
उमरी भोकर धर्माबाद बिलोली हदगाव या बाजूच्या तालुक्यात पिक विम्याची रक्कम मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान होऊन आजपर्यंत कोणतेही नुकसान भरपाई पिक विमा भेटला नाही. भरपूर प्रमाणात नुकसान झाले. २०२२ ते २४ पर्यंत सोयाबीन, कापूस व हरभरा यावर अतिवृष्टी व गारपीट झाली. पण विमा कंपनी व शासन हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोबत फसवणूक करत आहे. शेजारील तालुक्याला २५ % अग्रीम व उर्वरित रक्कम मिळून वीस दिवस उलटले तरी पण शासन व विमा कंपनीत डोळे झाकून बसले आहेत.
अहो ” आमदार ” साहेब हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिक विमा नुकसान भरपाई च्या निधीचा प्रश्न तेवढा मार्गी लावा अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी मारली आहे.तालुक्यात विकास कामांचे भूमिपूजन करण्याच्या नादात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे का ? की शेतकऱ्यांची प्रश्न तुमच्या कानावर येत नाहीत ? असे अनेक प्रश्न हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना पडले आहेत.
Discussion about this post