भोगावती/सिना नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा ; शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने नदीकाठच्या गावांमध्ये समाधान.
मोहोळ तालुका प्रतिनिधी /बापू घळके -मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातील प्रमुख सीना भोगावती व नागझरी नद्यांच्या बार्शी तालुक्यासह रामलिंग , उस्मानाबाद व तुळजापूर पाणलोट क्षेत्रात दोन दिवसां पासून पूर्वा नक्षत्राच्या सर्वदूर व दमदार व संततधार पावसाने राम नदीवरील ढाळेपिंपळगाव तसेच भोगावती नदीवरील हिंगणी प्रकल्प दोन वर्षा नंतर शंभर टक्के भरून सांडव्यातून मोठ्या प्रमाणा त पाणी वाहात आहे.नागझरी नदीवरील जवळगाव प्रकल्प अजून १०० टक्के भरला नसला तरी या प्रकल्पाच्या खालील भागातील ओढे नाल्यातील पाणी नदीतून मोठ्या प्रमाणात वाहत आहे.त्यामुळे भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
१९७२ सालच्या दुष्काळात पूर्णपणे मातीत बांधलेला हिंगणीप्रकल्प शेतकऱ्यांसाठी वादायिनी ठरला आहे.हिंगणी मध्यम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता १६०० द.ल.घ.फू.एवढी आहे.
सध्या धरण शंभर टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.पावसाची संततधार सुरूच असल्याने नदीच्या पाणी पात्रात वाढ होताना दिसत आहे.गेल्या वर्षी भीषण दुष्काळ पडल्याने मोहोळ तालुक्यातील ऐतिहासिक आष्टी (येवती ) मध्यम प्रकल्पाने तळ गाठला होता.पाझर तलाव नद्या बंधारे कोरडे पडल्याने भिषण पाणीटंचाई व दुष्काळ पडला होता. मात्र यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे १ सप्टेंबर रोजी हिंगणी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे.
भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरवात झाली आहे.हिंगणी येथील भोगावती नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे.
मोहोळ तालुक्यातील मनगोळी,वाळूज,देगाव डिकसळ ,नरखेड, भोयरे या गावातील सर्व नदीकाठच्या शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
▫️ उडीद ,सोयाबीनच्या शेंगाना जाग्यावरच मोड
येण्याची शक्यता :
मागील आठ दिवस उघडीप दिलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून जोरदार कोसळण्यास सुरुवात केल्याने काढणीला आलेले उडीद ,सोयाबीन पिकांत पाणी साठल्याने तसेच दोन ,तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नसल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत.पावसाचा जोर पुढील एक दोन दिवसांत ओसरला नाही तर पक्व झालेल्या उडीद व सोयाबीनच्या शेंगांना जाग्यावरच मोड येण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
▫️कांदा वाया जाण्याची भिती :
पावसाने उघडीप दिल्याने कांद्याची मांठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. मात्र दोन दिवसाच्या अखंड पावसाने कांदा सऱ्यांमध्ये पाणी साठले आहे तर काही ठिकाणचे रोप पाण्यात वाहून गेले आहे. जे शिल्लक आहे ते पिवळे पडू लागले आहे. पाऊस थांबला नाही तर हे कोवळे रोप पाण्याने इसनून ( नासून ) जाण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तवीले जात आहे.
चौकट :
” भोगावती, नागझरी व सीना नदीवरील धरणे भरलेली असून नदीच्या प्रवण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे नदीकाठच्या वस्त्यावरील गुरेढोरे व आपल्या शेतातील धान्याचे नुकसान व हानी होणार नाही याची नदीकाठच्या शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी काळजी घेण्यासाठी प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे “
बालाजी नागटिळक.मंडल अधिकारी अनगर,
फोटो ओळी :
मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातून वाहत असलेल्या भोगावती नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने दुथडी भरून वाहणारे पाणी छायाचित्रात दिसत आहे.
Discussion about this post