हवेली तालुका प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळा कोंढवे धावडे तालुका हवेली जिल्हा पुणे शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती पल्लवी शिरोडे यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य पुरस्काराने शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर यांच्या हस्ते दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी मुंबई येथे सन्मानित करण्यात आल्याने परिसरातून त्यांच्यावर अभिनंदन वर्षाव होत आहे.
राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे ,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षण विभाग प्रधान सचिव आय ए कुंदन, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे आदी उपस्थित होते.
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे.
समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज, राज्य आणि राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित कृतीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते.
पल्लवी शिरोडे यांनी चला रोखूया प्लास्टिकचा भस्मासुराला ..या उपक्रमाद्वारे कोंढवे धावडे गावात ई वेस्ट आणि प्लास्टिक वेस्ट संकलन प्रकल्प राबवला आहे .त्याचप्रमाणे त्यांनी राज्यस्तरीय सेतू अभ्यासक्रम निर्मिती स्वाध्याय अभ्यासमाला ,आनंददायी शनिवार, गंमत विज्ञानाची कार्यपुस्तिका निर्मितीमध्ये राज्यस्तरीय सहभाग नोंदवला आहे.
सर्टिफिकेशन कोर्स फॉर कोडींग कोर्समध्ये प्राविण्य मिळवून शाळेला संगणक लॅब व टॅब मिळवून दिला आहे .त्याचप्रमाणे IISERपुणे यांच्यामार्फत शाळेसाठी STEM लॅब मिळवून दिलेली आहे. त्यांना यावर्षी कॉस्मो किड्स या प्रकल्पासाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप मिळालेली आहे.
राज्यस्तरीय शासनाच्या दीक्षा ॲप ,VirtualClass इत्यादी पोर्टलवर व्हिडिओ निर्मिती योगदान दिलेले आहे.NCERT सायन्स किट मार्गदर्शिका मध्ये व्हिडिओ निर्मिती सहभाग आहे.
त्यांनी अनेक प्रशिक्षणांमध्ये राज्यस्तरीय मार्गदर्शकाची भूमिका बजावलेली आहे. तसेच त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उतरवले आहे..
अशा विद्यार्थी प्रिय ,उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षिका श्रीमती पल्लवी शिरोडे यांना राज्य शासनाने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंढवे धावडे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे..
Discussion about this post