प्रतिनिधी : डोंबिवलीत स्वामी समर्थ मठाबाहेर हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने
डोंबिवली दि.12.सप्टेंबर:
प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबाबत करण्यात आलेल्या अश्लाघ्य विधाना विरोधात डोंबिवलीतील स्वामी समर्थ मठा बाहेर महायुतीचे कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार निदर्शने केली. नवी मुंबईतील एका कार्यक्रमात पुरोगामी विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी ही विधाने केल्याचे समोर आले असून त्याविरोधात हे निषेध आंदोलन करण्यात आले.
गेल्या महिन्यात 22 ऑगस्ट रोजी नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. त्यामध्ये मनोगत व्यक्त करतांना ज्ञानेश महाराव यांनी वादग्रस्त विधान केले. त्याचे पडसाद डोंबिवलीतही उमटल्याचे दिसून आले. येथील स्वामी समर्थ मठा बाहेर झालेल्या या निषेध आंदोलनात विविध हिंदुत्ववादी संघटनांसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते. राजकारण करत असताना धर्माच्या विषयात हस्तक्षेप करू नये, धर्मावरील टीका कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, आणि यापुढे असे प्रकार घडल्यास तीव्र प्रतिक्रिया उमटतील अशा शब्दांत हिंदुत्ववादी संघटनांनी आपला संताप व्यक्त केला.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, मनसे शहरप्रमुख राहुल कामत, ब्राह्मण महासंघ अध्यक्ष राहुल दामले, पत्रकार अनिकेत घमंडी, दिनेश दुबे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी आणि अनेक डोंबिवलकर उपस्थित होते.
Discussion about this post