मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत पर्यावरणपूरक नाॅन ओवन फॅब्रिक्स कॅरीबॅगची निर्मिती करून शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या एस्.के.स्क्वेअर इंटरप्राईजेसच्या संचालिका इंजि.सौ.कोमल सचिन तायडे यांना बुलढाणा येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
सौ.कोमलताई तायडे या उच्च विद्याविभूषित असुन त्यांनी इंजिनिअरची पदवी प्राप्त केली आहे.त्यांचे माहेर मलकापूर असुन मलकापूर तालुक्यातील वरखेड सासुरवाडी आहे.सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या सौ.कोमलताई यांनी महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने एस्. के.एंटरप्राईजेसच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत पर्यावरणपूरक नाॅन ओवन फॅब्रिक्स कॅरीबॅगची निर्मिती सुरू करून शेकडो महिलांना रोजगार देण्याचे कार्य सुरू करून महिलांना घरी बसुनच रोजगाराचे नविन दालन खुले करून दिले आहे.अल्पावधितच या उद्योगाला चालना देत महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव,आ.संजय कुटे,माजी मंत्री आ.राजेन्द्र शिंगणे,आ.संजय गायकवाड,आ.संजय रायमुलकर,आ.आकाशदादा फुंडकर,आ.श्वेताताई महाले,आ.वसंत खंडेलवाल,आ.किरण सरनाईक,माजी आ.चैनसुख संचेती आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्यावतीने करण्यात आलेला सत्कार केवळ माझा सत्कार नसुन माझ्या समवेत काम करणाऱ्या असंख्य महिलांचा सत्कार असुन या सत्कारामुळे माझी जबाबदारी आणखीच वाढली आहे असे मी मानते.सुरू केलेल्या या व्यवसायात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होत असुन त्यांचा उत्साह व पाठिंबा पाहता आगामी काळात शेकडो महिलांना मिळत असलेला रोजगार हजारो महिलांना कसा मिळेल? यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील अशी प्रतिक्रिया इंजिनिअर सौ.कोमल तायडे यांनी व्यक्त केली आहे.तर त्यांचे पती इंजिनिअर सचिन तायडे म्हणाले की,कोमल गेल्या काही दिवसांपासून एस्.के.स्क्वेअर इंटरप्राईजेसच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सतत परिश्रम घेत आहे.अनेकदा पतीमुळे पत्निचे नाव मोठे होते.,मात्र पत्निमुळे पतीचे नाव मोठे झाल्याचे क्वचितच पाहायला मिळते.त्यामुळे माझ्या पत्निचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने झालेला सत्कार निश्चितच कौतुकास्पद असून पत्नी म्हणून मला कायमच कोमलचा अभिमान आहे.सौ.कोमल तायडे यांचेवर समाजातील सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Discussion about this post