शिवतेज मित्र मंडळाचा उपक्रम; आंजर्लेच्या पंकज मयेकर यांचा प्रथम क्रमांक
रत्नागिरी/दापोली (केळशी)[प्रतिनिधी: राकेश.चिलबे]दि १५फेब्रुवारी २०२६छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ केळशी समुद्रकिनारी शिवतेज मित्र मंडळ, केळशी यांच्या वतीने भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण क्रीडा परंपरेला उजाळा देणाऱ्या या स्पर्धेला पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शर्यतीत एकूण १७ बैलगाड्यांनी सहभाग नोंदवत वेग, ताकद आणि नियंत्रणाची शानदार चुरस रंगवली. समुद्रकिनाऱ्यावर विशेष तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवर प्रत्येक फेरीत स्पर्धकांनी आपली ताकद दाखवली. प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात आणि घोषणाबाजीमध्ये वातावरण अधिकच उत्साहपूर्ण झाले होते.
विजेते पुढीलप्रमाणे:प्रथम क्रमांक – पंकज मयेकर (आंजर्ले) द्वितीय क्रमांक – नितेश बोरकर (पाळंदे) तृतीय क्रमांक – सुबोध बोरकर (पाळंदे)प्रथम क्रमांक पटकावत पंकज मयेकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शर्यतीवर आपली छाप उमटवली. विजेत्यांना सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आयोजकांनी शर्यती दरम्यान सुरक्षिततेच्या सर्व आवश्यक उपाययोजना केल्याचे सांगितले.
शिवतेज मित्र मंडळाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण संस्कृती आणि पारंपरिक क्रीडा प्रकारांना चालना मिळाली असून, शिवजयंतीचा उत्सव उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
ग्रामीण परंपरेचा जल्लोष; शिवजयंतीनिमित्त केळशी समुद्रकिनारी १७ बैलगाड्यांची थरारक शर्यत









