#मलाभेटलेली #_अनामिका…!
दंडवत…sd
आज जागतिक महिला दिन…
महानुभाव पंथाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा पंथ उदयास येण्यास तथा इथ आज जे काही शास्त्र चिंतन घडते त्याचं निमित्त म्हणून ज्या माऊलींत जीज्ञासक वृत्ती होता. त्याच पूजनीय माऊली म्हणजेच पूजनीय आचार्य त महादइसा…
अगदी अश्या काळात त्या होऊन गेल्या…
ज्या काळी स्त्रियांना शास्त्र काय तर शिक्षण घेणे देखील अशक्य होते…
मला ही आजच्या ह्या काळात अशाच एक महिला साधक प्रेरणास्थान म्हणून भेटल्या त्यांची आठवण ही तितकीच महत्त्वाची…
त्यांच्या बद्दल मी काही स्व अनुभव रेखाटली होती ती एका ग्रंथात अभिप्राय स्वरूपात नक्कीच वाचायला मिळेल…
हाच तो लेखन प्रपंच मी एका पुस्तकांसाठी दिलेल्या शुभेच्छापर अभिप्राय मधील काही भाग आहे …
तो आज सहजच महिला दिनाचे निमित्ताने आपल्या समोर त्यांची स्मृती म्हणून सादर करावं वाटल…
आपण स्मृती रोजच वाचतो…
ऐकतो…
पण डोळ्या समोर घडलेल्या घटनांचा साक्षीदार होणे किती विलोभनीय दृश्य असते…
त्याची उजळणी करताना मनाला आवर घालण देखील शक्य होईल असे वाटत नाही…
स्वतःच्या भावना विवश झाले शिवाय राहत नाही…
मला नाशिक येथील एक पंथीय अनुयायी यांनी लेखन केलेल्या पुस्तकास माझी प्रस्तावना द्यावी अशी मागणी करण्यात आली…
मी त्यावेळी थोड भाव हरवलेला साधरण जीव., कारण मी एका परमेश्वर प्रिय भक्ता बद्दल काय लिहावं असं मनात विचार करत होतो…
परंतु त्यांनी जे पुस्तक लिहून पूर्ण केलेलं आहे त्या पुस्तकाचा विषय असलेले ते ‘पात्र’, ती ‘स्त्री’, ती ‘तपस्वीनी साध्वी’ माझ्यासाठी खूप ‘महान प्रेरणादायी’ आहे आणि त्यावर मी माझा अभिप्राय देणारच आहे…
पण तत्पूर्वी….
आपण आजपावेतो परमेश्वराच्या बाबतीत जी काही चरित्र, स्थळे, पाठ, अभ्यासली वाचली, ती म्हणजे परमेश्वराचे बाबतील असलेली श्रुती होय…
तसेच परमेश्वराने घालून दिलेल्या आचार विचारावर चालून धर्म काढणाऱ्या पूर्वजांच्या बाबतीत तथा पूजनीय आचार्य म्हणजेच नागदेवचार्यांच्या यांच्याबाबतीत जी बोलली जाते त्यास स्मृती होय…
नागदेवचार्याच्या पुढे भाईदेवबास, रामेश्वरबास, परशरामबास, हिरईसा, नागाईसा, यांच्याबाबतीत वृध्दाचार…… तसेच गुर्जर शिवबासापर्यंतचा मार्गरुदी व प्रमाणे आजची व्यवस्था पाळली जात आहे… येथे अशा गोष्टींचा उल्लेखनीय गोषवारा घेतला आहे, त्याला कारण म्हणजेच ह्या पुस्तकात ज्या महान व्यक्तीरेखेला तथा आदर्शवत स्त्रीच्या स्मृतींना उजाळा दिलेला आहे, ती स्त्री मी स्वतः अनुभवली आहे. आणि त्यांच्या पुस्तकानुषंगाने त्याच मातेचं चरित्र मांडलेलं आहे. त्यांनी ज्या मातेचा आदर्श समोर आणला आहे. त्या साध्वीचा त्याग रेखांकित केलेला आहे, ज्या मातेच्या कालक्रमीत पदचिन्हांचे ठसे माझ्यासाठी प्रकाशित केले आहेत त्या मातेला, त्याच महान तपस्विनीला भेटण्याचा मलाही योग प्राप्त झाला होता. पुढे पुढे त्यांच्यासोबत मला बऱ्याचवेळा भेटण्याचा योग येत गेला. भेटी व प्रत्येक भेटीनंतर ती भेट माझ्यासाठी माझ्या जीवनाला एक वेगळं वळण लावून गेली असे नमूद करणे चुकीचे ठरणार नाही…
त्या मातेच्या मुखातून निघणारी शब्दसुमने ऐकून, मला “श्रीचक्रधर” द्या म्हणत घरोघरी भिक्षा मागणारे नागदेवाचार्य आठवले…
मला आठवली ती निर्भीड, अरण्यात जीवन कंठीत करणारी नात नागाईसा किंवा असेही म्हणता येईल, की त्या मातेच्या समीपतेत मला सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींच्या लीळाचरित्रातील अनेक पात्र अनुभवण्यास मिळालीत. मला अनुभवण्यासाठी मिळालेली माता व जिच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं ती माता. आज मी जो अभिप्राय ज्या मातेवर देत आहे, ती माता काल्पनिक कथेतील नसून वास्तविकतेतील आहे आणि ती कथा आहे एका अनामिक तपस्विनीबद्दल…
आपण सर्व महानुभावपंथीय परम परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी निरुपीत ब्रम्हविद्या शास्त्राचा अभ्यास करतो, मनन, वाचन करतो आणि त्यात सांगितल्या प्रमाणे, हा मनुष्य देह परमेश्वराच्या भक्तीसाठी आणि तोच प्राप्त व्हावा म्हणून त्याच्या कारणे देण्याचे जाणतो. आणि त्याच वचनरुप गोविंदाच्या सन्नीधानात नामस्मरण, अटन विजन भिक्षा भोजन करुन जन्म क्षेपणारी ही एक महान तपस्विनी, यांच्याशी माझी ओळख योगायोगानेच झाली होती. त्यांच्यासोबत झालेली ओळख, त्यांच्या सर्वगुण संपन्नतेने माझ्या जीवनाला एक मार्गदर्शक ठरली. माझ्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली असे मनःपूर्वक सांगतो…
त्याचप्रमाणे नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात परमेश्वराने सांगितलेल्या मार्गाने ज्या ज्या साधनांनी आपले जीवन व्यतीत केले आणि आपला देह परमेश्वर कारणे झिजवला आणि परमेश्वरा कारणेच अर्पण केला. त्यात ह्या तपस्विनींची स्मृती कायम माझ्या मनात व स्मरणात राहील यांत शंका नाही…
आपल्या ह्या महानुभाव पंथाची स्थापना साधन दाता परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीचक्रधर प्रभू यांनी सुमारे ८५० वर्षापूर्वी केली. श्री चक्रधर स्वामीनीं या मार्गाचे आचरण करणाऱ्या साधकांसाठी सांगितलेली आचरण शैली म्हणजेच असतिपरि. ही असतिपरि स्वामींनी त्यांच्या परिभ्रमण काळात सांगितली असेच नाही तर स्वतः ती कृती करून दाखवली…
त्याप्रमाणे स्वतः परमेश्वर अवतार सर्वज्ञांनी या भूतलावरील वावरत असताना तो आचार करून सर्व मानव जातीला जीव उध्दरणाचा मार्ग आपल्या परावाणीने ‘ब्रम्हविद्या शास्त्र’ रुपाने सांगितला…
ह्या मार्गाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत अनेक साधकानी आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय काय हे समजून घेऊन, अनुसरण घेऊन असतिपरि आचरण करून आपला देह परमेश्वराला अर्पण केला…
अश्याच एक मला भेटलेल्या तपस्वी आपल्यासमोर आणलेली तपस्विनी ह्या सुध्दा परमेश्वर भेटावा ह्या एकाच तळमळीने शेवटच्या श्वासापर्यंत नामस्मरण आणि वैराग्य आचरण करीत होत्या…
आपण स्मृतीस्थळ, वृध्दाचार या ग्रंथात हे वाचलं असेल अथवा पंथातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठांकडून संत महंतांकडून ऐकलेही असेल, की आपल्या पंथातील अनेक श्रेष्ठ साधकांनी असतिपरि आचरुन अटन, विजन, मिक्षा भोजन करुन झाडातळी आपला देह क्षेपला आहे. परंतु अशाच प्रकारे देह क्षेपलेल्या एका तपस्विनीला मीसुध्दा त्या दिवशी अखेरचा दंडवत करुन आलो होतो. ह्याच अनामिक तपस्विनीने पंथाचा उपदेश घेतल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे वरिष्ठांकडून शास्त्राचे धडे गिरवले. त्यानंतर असतिपरि नीट समजून घेतली आणि ती आचरणात, अंमलात आणण्याचा कठोर निर्णय घेऊन ही माता इतर काही तपस्वींना सोबत घेऊन अटन विजन करत गावोगावी जाऊ लागली…
विदर्भातून स्थान वंदन करण्यासाठी निमित्ताने बाहेर पडलेल्या या साध्वी सुरुवातीला १२ साधविचा असलेला समूह ब्रम्हगिरी येथे येईपर्यंत फक्त २ जणींचा राहिला होता आणि त्यांच्यातील एक महिला साधक ह्या डोंगराचा जंगली परिसर जंगली श्वापदे निर्जन स्थळे यांच्या भीतीने सोबतीला असलेली ती महिला साधक देखील डोंगरदऱ्यातील परिस्थिती बघून साथ सोडून निघून गेली. परंतु ही माऊली त्यामुळे डगमगून न जाता ही अनामिका तपस्विनी एकटीच ढोऱ्या डोंगरात आली आणि गेली १२-१३ वर्षे एकटीच तेथे राहून तपसाधना, नामस्मरण करुन रहात होती…
ह्या १२-१३ वर्षे कालावधीत त्यांनी कधीही कुणालाही आपले नाव, गाव सांगितले नाही, की कुणालाही आपलंवले नाही. त्यांच्या तपश्चर्या काळात त्यांची कोणाशी भेट होत असेल तर ती फक्त ज्या घरी त्या भीक्षासाठी जात असतील तर त्यांच्याशी अथवा ढोऱ्या डोंगराला भेट देण्यासाठी येत असतील त्यांच्याशीच. श्रीचक्रधर नामाशिवाय दुसरे काही त्यांच्या तोंडून बाहेर येत नसे. मुखात सतत श्रीचक्रधर हेच नाम असायचे…
अशी ही तपस्विनी जेव्हा ढोऱ्या डोंगरात आली होती, तेव्हा काही दिवस मौनव्रत धारण करुन राहात होती. काही दिवस ती सोडनर परिवाराच्या गुरांच्या गोठ्यात झोपत असे, तर काही दिवस घुगरे कुटुंबियांच्या गुरांच्या गोठ्यात झोपत असे. परंतु ह्या तपस्विनीला झोपलेले कधी कोणी पाहिलेच नाही…
कारण कुटुंबियांच्या गोठ्यात ती राहात असे, त्या कुटुंबातील सदस्य झोपले, की ही न थांबता, थकता दंडवत घालीत असे ती थेट पहाटेपर्यंत अथवा अटन वीजन करता बाहेर पडेपर्यंत. असा हा दंडवत घालण्याचा क्रम शेवटच्या श्वासापर्यंत चालू होता. भाग्यवान ते जीव ज्यांना प्रथम ती भेटली. डोंगरदरीतून चालत असता, पाय घसरुन ही तपस्विनी डोंगराचे खोल दरीत कोसळली, परंतु तिथे गुरे चारणाऱ्या, कंदमुळे वेचणाऱ्या गुराख्यांना ती मुर्श्चित अवस्थेत दिसली. जणू परमेश्वरानेच त्यांना पाठवलं असावं सहाय्य करायला. जे सतत परमेश्वर नामस्मरण, चिंतन करतात त्यांना परमेश्वरही सहाय्य करतोच त्याचच हे उदाहरण, त्या गुराख्यांना आजूबाजूला राहणाऱ्या उपदेशी बंधू प.स. श्री. रघुनाथ मधये, प. से. श्री. दिगंबर घोगरे यांना माहिती दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तेथे धाव घेतली आणि त्या तपस्विनी मातेला कापडी झोळीत घालून वर काढले. गाडीत घालून घोटी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु दाखल करुन घेताना नाव नोंद करुन घेण्याची वेळ आली तेव्हा त्या थोर तपस्विनीच्या
मुखातून श्री चक्रधर ह्याव्यतिरिक्त काहीच बाहेर पडत नव्हते…
हे बघून उपस्थित सर्वांचे मन हेलावून गेले. कसेतरी तेथील डॉक्टरांना विनंती करुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्याची विनंती केली. तेथे थोडे उपचार करुन त्यांना नाशिक येथे आणण्यात आले, त्यावेळी प. से. रघुनाथ मध्ये, प. से. श्री. दिगंबर घोगरे / घुगरे, प. से. नागरे यांची मोलाची साथ लाभली…
मात्र पुन्हा एकदा त्यांचे नाव काय लिहायचे यावरुन मन चक्रावून टाकणारा अनुभव आला. त्या मातेने आपले नाव, गाव सर्व काही श्रीचक्रधर असे सांगितले. सरकारी रुग्णालयात नियमाप्रमाणे पेशंटचे नाव, गाव लिहावे लागते, तर काय नाव लिहावे तेच कळेना…
मात्र नाव लिहिल्याशिवाय उपचार मिळणार नाही आणि नाव तर कुणालाच माहिती नाही, असा पेचप्रसंग निर्माण झाला. लवकरात लवकर उपचार सुरु करणे आवश्यक होते. तेव्हा सर्व मंडळींनी विचार विनिमय करुन ‘महानुभाव आई’ असे नाव सांगून उपचार सुरु केले…
चार पाच दिवस सरकारी रुग्णालयात उपचारासाठी ठेवून नंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करावे असे मंडळींनी ठरवले. मात्र सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांची विनंती मनाला थक्क करणारी होती. जणूकाही त्या तपस्विनी मातेचे थोरपण त्यांना उमगले होते. तिच्यावर असलेला परमेश्वरी वरदहस्तचा त्यांना साक्षात्कार झाला होता. या तपस्विनी मातेला इथून नेऊ नका. आम्ही त्यांच्यावर उपचार करण्यात कुठलीच कसूर ठेवणार नाही. आम्हाला या मातेवर उपचार करण्याची संधी द्या. असे त्यांचे विधान होते.
(ते उपचार करणारे डॉक्टर जैन असल्याने तपस्विनीची साधना किती महान असते ह्याची त्यांना कल्पना होती.)
त्यानंतर थोडे दिवस खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले. बरे वाटल्यावर त्या थोर तपस्विनीने परत ढोऱ्या डोंगरात जाण्याचे ठरवले. आपला अंतिम श्वास तिथंच घ्यावा ही त्यांची तळमळ होती…
सांगायला खूप अभिमान वाटतो की,
त्या जंगलात त्यावेळी कुठलाही आश्रम नव्हता ना कोणत्याही प्रकारचा आधार. ढोऱ्या डोंगरात देह क्षेपण्यासाठी आलेल्या त्या महान तपस्विनीशी माझी प्रथम भेट झाली, त्यावेळी मी माझे सन्मित्र यांच्याबरोबर ढोऱ्या डोंगरात स्थानभेटीचे निमित्ताने वंदन तथा संत भेटीसाठी गेलो होतो. तेव्हा कळलं की ह्या परिसरात एक तपस्विनी आहेत. आम्ही त्यांना भेटायला गेलो, तेव्हा त्या आम्हाला भेटल्या, पण त्यांनी आमच्याकडून काहीच स्वीकारले नाही… माझ्या मित्राने सांगितलेला एक किस्सा तर असा आहे की,
डोळ्यातून अश्रूधारा निघाल्या. ते म्हणाले की ते जेव्हा प्रथम त्या तपस्विनीला भेटले होते, त्यावेळी पंथ परंपरेनुसार त्यांनी त्या तपस्विनी आईंना काही द्रव्य भेट म्हणून दिले,
कारण रिक्तहस्ते या तपस्विनी आईची भेट कशी घ्यावी असा प्रश्न त्यांना पडला. त्या मातेने ते द्रव्य हवेत भिरकावून दिले आणि निक्षूण सांगितले की पुन्हा कधीही अशी भेट देऊ नका. आणि त्या तिथून निघून गेल्या…
ऐकुन कुणीही सुन्न व्हावं असाच हा प्रसंग होता. पैशाला त्या कचऱ्या समान समजत होत्या. केवढी ही विरक्ती, माझ्या मित्राकडून ही हकीकत ऐकून त्या महान आणि विरक्त तपस्विनीला भेटण्याची मला ओढ लागली होती. त्यामुळे माझ्या त्या मित्राबरोबर जेव्हा ढोऱ्या डोंगरात क्षेत्र भेटीसाठी जाण्याचा योग आला, तेव्हा त्या तपस्विनी ताईंना भेटायला मी खूप उत्सूक होतो.
भेटीचा योग आला होता. ०सांजेगांव या खेड्यातील महानुभावपंथीय अनुयायी प. से. श्री. बंदवने यांच्या घरी त्या तपस्विनी एकांतात बसून नामस्मरण करत होत्या. त्यांना कसे भेटायचे ह्याची कल्पना असल्याने त्यांना काहीही न देता फक्त दंडवत केला. त्यांनीही आम्हाला दंडवत केला. मुखाने सतत श्री चक्रधर जप चालू होता. केवढी ही साधना, केवढा हा त्याग. देह क्षेपण्याची हीपरी त्यांच्याकडून घेण्यासारखी आहे. त्यांचे दर्शन झाले, भेटण्यासाठी संधी मिळाली हे आमचे भाग्यच
मला त्या तपस्विनी मातेचा चेहरा दिसताच गहिवरून आले. त्यांच्या मुखातून दंडवत शब्द ऐकून मी भारावून गेलो. हृदयात आनंदाचे उधाण आले…
ह्यापूर्वी मी होतं. फक्त ऐकून होतो, की आपल्या पंथातील काही अनुसरलेले थोर संत महंत, मिक्षक, तपस्विनी ह्या आपले अंतिम ध्येय गाठण्यासाठी आपल्या देहाची, जीवाची तमा न बाळगता, फक्त परमेश्वर व्हावा ह्या एकच ध्येयाने असतिपरिचं आचरण करत आहेत. ह्या तपस्विनीला भेटल्यावर मला सप्तश्रृंगी पर्वतावर देह क्षेपणाऱ्या नाती नागाईसा यांची आठवण झाली…
ह्या भेटकाळादरम्यान माझ्या मनात असलेल्या अनेक शंका मी त्यांच्या समोर मांडल्या. त्यांनी ही माझ्या सर्व शंकांचे सविस्तर निरसन केले. साधारण संध्याकाळी पाच वाजता आमची भेट झाली आणि त्यानंतर दोन तास चर्चा झाली आणि आम्ही त्यांचा निरोप घेतला. पण मनातील काहूर काही शांत झाले नव्हते…
त्यानंतर त्या मातेला भेटायला मी अनेक वेळा ढोऱ्या डोंगरात गेलो, परंतु त्यांची भेट झाली नाही. एकदा दिल्ली येथील एक तपस्विनी नाशिक येथे क्षेत्र भेटीसाठी, स्थानवंदनासाठी आल्या होत्या. त्यांना क्षेत्रभेट म्हणून ढोऱ्या डोंगरात घेऊन गेलो होतो. त्यावेळी सहज म्हणून शोध घेतला असता त्या प. से. श्री दशरथ गोवर्धने यांच्याकडे असल्याचे समजले. तिथे गेल्यावर त्यांची भेट होताच त्यांनी मला ओळखले व मागील भेटीचा संदर्भ देऊन माझ्या नावासकट मला ओळखले. हे बघून मी आश्चर्यचकीत व आनंदीत झालो. ह्यावेळी माझ्याबरोबर प. से. श्री बाळकृष्ण घुगे, आणि तपस्विनी आऊसाबाई नोयडा होत्या. ह्यावेळी देखील आमची खूप वेळ चर्चा झाली. त्यांनाही मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर आम्ही पुढील प्रवासासाठी निघून गेलो…
माझ्या मनात त्यांची आठवण होती ती स्वामींच्या स्मरणात देहभान हरपून गेलेली व अंतिम श्वासापर्यंत श्री चक्रधर हे नाम मनात घट्ट धरून ठेवलेली महान तपस्विनी म्हणूनच. अशी ही तपस्विनी आज आपल्यात नाही, पण त्यांच्या ईश्वर भेटीच्या जे प्रयाणानंतर त्यांचे शरीर जेव्हा माझ्यासमोर आले, तेव्हा मी मनाने फार आनंदी होतो…
खरंतर हे बघून कुणीही माझ्यावर रागावणार हे मला माहिती आहे. पण त्या आनंदाचं कारण असे की,
हा देह परमेश्वराने ज्या कारणासाठी दिला होता, त्याच कारणासाठी त्यांनी तो सत्कारणी लावला होता. परमेश्वर मिळावा ह्या उद्देशाने झिजवला होता आणि आज त्याचं सोनं झालं होतं. ह्या समाधानाने माझं मन भरून गेलं होतं…
आपल्या नावाची ओळख जगभर व्हावी म्हणून किर्तीरुप क्रिया करणारी अनेक अनुसरलेली मंडळी मी बघितली आणि अजूनही आजही आहेत. पण मी स्वतःला धन्य समजतो की, माझी अशा एका तपस्विनीशी भेट झाली होती, जी आमच्या पूर्वजांनी सांगितलेल्या अनेक महान साधकांनी ढोऱ्या डोंगरात, चंदन वंदन, सप्तशृंग येथे जन्म क्षेपले आहेत त्यांच्या अथवा नाती नागाईसा यांच्या तोलामोलाची होती…
मी जेव्हा त्या तपस्विनी आईबद्दल चौकशी केली, तेव्हा कळले की, त्या मागील दहा दिवसांपासून आजारी होत्या व दवाखान्यात जायला तयार नव्हत्या. परंतु तेथील काही उपदेशी बांधवांनी फोन केला व त्यांना अॅडमिट केले, अशी ही महान तपस्विनी माता जिने कधीही कुणाकडूनही पूजा करुन घेतली नाही, कि कधी द्रव्य, वस्तू स्विकारली नाही. जी माऊलीगुरुवार ता. १८ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी १० वा. परमेश्वर भेटीला गेली. जणूकाही दसऱ्याच्या दिवशी मानव देहातूर त्यांचा आत्मा सीमोल्लंघन करुन परमेश्वर भेटीला गेला…
आणि हो तिचा जीवनप्रवास अनुभवातून व्यक्त करणे म्हणजे आजच्याआ घडीला सध्याच्या काळात असणारी महानुभाव साधकाना तसेच त्यापुढीलशंक अनुयार्थीसाठी ही स्मृती निरंतर आठवणीत राहील…
सदर माऊली ची ही स्मृती एक ‘वीरगाथा’ आहे. अशी एक म्हण आहे…
‘वीरांचा पराक्रम रणांत” आणि “संन्याशी यांचा वनांत’
सांगायला अभिमान वाटतो की…
त्याच माऊलीचा आचार बघून मी त्यांच्या सोबत घडलेल्या भेटीचं निमित्त करून मी ह्या मार्गावर चालण्यासाठी मार्गक्रमण करण्यासाठी लवकरच प्रभूच्या वचनावर मार्गस्थ होईल…
अश्याच ह्या याच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माऊलीच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांना सादर दंडवत…
तसेच पंथातील शास्त्राचे माध्यमातून मिळालेली शिकवण पदोपदी आठवण ठेवून आपला रोजचा प्रवास ईश्वर भेटावा ही जिद्द उराशी ठेवून आचरण हाच खरा धर्म ही भावना जपणारी सर्व च ईश्वराच्या साध्वी तसेच महिला माता भगिनी यांना सादर दंडवत…
दंडवत माझा देव श्रीचक्रधर…sd
आपलाच… प से सुरेश सरूबाई देवराम डोळसे, नाशिक
मो. : ९४२२७६२९१४




