करमाळा | प्रतिनिधी
श्री कमलादेवी मंदिर येथे मुख्य पुजारी दादा पुजारी यांच्या वागणुकीबाबत काही भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांशी योग्य पद्धतीने संवाद साधला जात नसल्याचा आरोप भाविकांकडून करण्यात येत आहे.
भाविकांच्या म्हणण्यानुसार, मंदिरातील पूजा व दर्शन व्यवस्थेमध्ये वशिलेबाजी होत असून आर्थिकदृष्ट्या सक्षम किंवा ओळखीतील व्यक्तींना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सामान्य भाविकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असून त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची तक्रार काही भक्तांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी मंदिर हे सर्व श्रद्धाळूंसाठी समान असावे, अशी भावना व्यक्त केली आहे. प्रत्येक भाविकाशी आदराने, संयमाने आणि पारदर्शकपणे वागणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी मांडले. तसेच मंदिर प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी भक्तांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत मुख्य पुजारी दादा पुजारी किंवा मंदिर प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.








