महाराष्ट्र राज्य सरकारने वाढत्या बालगुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विधानसभेत घोषणा करत अल्पवयीन गुन्हेगारांसाठी असलेली वयोमर्यादा १८ वर्षांवरून १६ वर्षांपर्यंत कमी करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीकडे वाढता कल या विषयावर आमदार Arjun Khotkar यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बालकांचा वापर गंभीर गुन्हे तसेच अमली पदार्थांच्या वितरणासाठी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या कायदेशीर तरतुदींचा गैरफायदा घेत बालकांकडून गुन्हे घडवून आणले जात असल्याने कायद्यात आवश्यक बदल करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच १६ वर्षांखालील मुलांकडूनही गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याची प्रकरणे समोर येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर घटनांचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. बालकांचा वापर करणाऱ्या टोळ्या आणि संघटित गुन्हेगारीशी संबंधित व्यक्तींवर अधिक कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आवश्यक बदलांचा विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, लातूर येथे घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, ती घटना कौटुंबिक वादातून घडलेली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात सहभाग निष्पन्न झालेल्या विधिसंघर्षित बालकांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
