श्रीरामपूर | प्रतिनिधी
महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार राज्यातील दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार श्रीरामपूर येथील दुय्यम कारागृहातील कैद्यांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
दुय्यम कारागृहांच्या सद्यस्थितीचा अभ्यास करण्यासाठी शासनाने विशेष अभ्यास गटाची स्थापना केली होती. या गटाने आपला अंतिम अहवाल ३० डिसेंबर २०२४ रोजी शासनाला सादर केला होता. त्यानंतर महसूल विभागाकडून गृह विभागाकडे दुय्यम कारागृहांचे हस्तांतरण करण्याबाबत अप्पर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग तसेच गृह विभाग यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन ५ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले होते.
या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर समितीच्या शिफारशी विचारात घेऊन महसूल विभागाच्या अधिनस्त असलेली सर्व दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आवश्यकतेनुसार संबंधित कैद्यांची रवानगी नजिकच्या जिल्हा कारागृह वर्ग-३ मध्ये करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या कारागृहांशी संबंधित गृह विभागातील लिपिक संवर्गातील काही पदे श्रीरामपूर, महाड, मालेगाव (नाशिक), तळोदा (नंदुरबार), कराड (सातारा) आणि उदगीर (लातूर) येथे मंजूर करण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत ही पदे रिक्त असून संबंधित कारागृह उपनिरीक्षक कार्यालयाकडे वर्ग करण्याची कार्यवाही गृह विभागामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
