प्रहार दिव्यांग क्रांतीचा स्तुत्य उपक्रम; गरजू दिव्यांगांना मदतीचा हात
देवळी | दि. ५ जुलै
दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार व विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारे आमदार दिव्यांगहृदयसम्राट बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार दिव्यांग क्रांती, वर्धा यांच्या वतीने देवळी शहरातील अत्यंत गरजू दिव्यांग लाभार्थ्यांना कपडे, किराणा किट तसेच विविध जीवनावश्यक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाभार्थी नितेश वानखेडे, सविता कासारे, भावेश कासारे, लक्ष्मी मोहेकर, नरेश मुरार व नैतिक जामनकर यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. संबंधित लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून काही जण एकल पालकांसोबत राहत आहेत, तर काहींना पालकांचाही आधार नसल्याचे यावेळी समोर आले. अनेकांकडे स्वतःचे पक्के घर नसून ते कुडाच्या व पत्र्याच्या घरात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आहेत.
विशेष म्हणजे, हे सर्व लाभार्थी १०० टक्के अंध अथवा १०० टक्के मूकबधिर प्रवर्गातील असल्याने आकस्मिक प्रसंगी मदतीसाठी कोणालाही बोलावणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण ठरते. त्यांच्या राहणीमानाची पाहणी केल्यानंतर प्रहार दिव्यांग क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी भविष्यात त्यांना अधिक मदत उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली. तसेच शासकीय घरकुल योजनेंतर्गत या लाभार्थ्यांचा समावेश व्हावा, यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती, वर्धा येथील अमोद क्षीरसागर, जब्बार तंवर, प्रमोद कुऱ्हाटकर, पंकज गावंडे, सचिन पोहाने, सिद्धार्थ कांबळे, ज्ञानेश्वर गिरसपुंजे, मुरलीधर झाडे, पवन सूरकार, नरेश वैद्य, नरेंद्र वानखेडे, हर्षल येसणकर, शैलेश खंडाळकर, शालिकराव खणकुरे, प्रमोद वरडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत गरजू दिव्यांगांच्या दारी जाऊन मदतीचा हात देण्याच्या या उपक्रमाचे परिसरात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे गरजू दिव्यांग बांधवांना केवळ जीवनावश्यक वस्तूंची मदतच मिळाली नाही, तर समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वासही त्यांच्या मनात निर्माण झाला.
