अंबाजोगाई | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील पारंपारिक धार्मिक, सांप्रदायिक आणि लोककलेला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने राज्यस्तरीय “कला महोत्सव – 2026” चे आयोजन लवकरच अंबाजोगाई येथे करण्यात येणार असल्याची माहिती अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलचे संपादक तथा कला महोत्सव समितीचे अध्यक्ष पत्रकार सतीश मोरे यांनी दिली आहे.
अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त या कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून, यासाठी सांस्कृतिक, धार्मिक, लोककलावंत आणि पत्रकार मित्रांची नुकतीच संयुक्त बैठक पार पडली. अनेक वर्षांपासून हा महोत्सव अंबाजोगाई येथे आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि अखेर यावर्षी त्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे मोरे यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, हा तीन दिवसीय राज्यस्तरीय कला महोत्सव असणार असून महाराष्ट्रातील नामवंत कलावंतांचा स्पर्धात्मक कलाविष्कार नागरिकांना पाहायला मिळणार आहे. महोत्सवामध्ये समूह भजन स्पर्धा, पारंपारिक समूह लोकनृत्य स्पर्धा, समूह आराधी गायन स्पर्धा तसेच पारंपारिक वैयक्तिक नृत्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके, स्मृतीचिन्हे प्रदान करण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
हा महोत्सव श्री योगेश्वरी देवी मंदिर परिसरात अथवा नगरपरिषद अंबाजोगाई येथील श्री मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात यावा, अशी भावना अनेक सांस्कृतिक, धार्मिक, सांप्रदायिक व पत्रकार मित्रांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार श्री योगेश्वरी विश्वस्त मंडळाकडे कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत अधिकृत विनंती अर्ज करण्यात आला आहे.
यासंदर्भात लवकरच योगेश्वरी देवी विश्वस्त मंडळाची बैठक होऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि कला महोत्सव समितीला सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा पत्रकार सतीश मोरे यांनी व्यक्त केली.
