शहादा | प्रतिनिधी | दि. ६ जुलै २०२६
व्हॉलंटरी हायस्कूल, शहादा येथे इयत्ता ६ वीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय चार दिवसीय शिक्षकीय प्रशिक्षणास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.
या प्रशिक्षणामध्ये सुलोभक म्हणून श्री. विजयसिंह ठाकूर, श्री. योगेश पाटील आणि श्री. भूषण सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी अनुक्रमे राज्य अभ्यासक्रम आराखडा – शालेय शिक्षण २०२४, समग्र प्रगती पुस्तक पत्रक तसेच व्यावसायिक शिक्षण या विषयांवर सविस्तर माहिती दिली. विविध उदाहरणे, कृती आणि चर्चांच्या माध्यमातून त्यांनी विषयातील संकल्पना शिक्षकांना प्रभावीपणे समजावून सांगितल्या.
प्रशिक्षणाचे समन्वयक मा. साठे सर (केंद्रप्रमुख, आमोदा केंद्र) यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व विशद करत शिक्षकांना आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच मा. चव्हाण सर यांनी प्रशिक्षणात मनोरंजक वातावरण निर्माण करत सहभागी शिक्षकांच्या विविध शंका व अडचणींचे निरसन केले.
प्रशिक्षणादरम्यान सहभागी शिक्षकांसाठी दोन वेळा चहा तसेच स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला.
या चार दिवसीय प्रशिक्षणामुळे शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन प्रक्रियेबाबत अधिक सक्षम मार्गदर्शन मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
