प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि लोणावळा परिसरातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदी येथील अनेक छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले असून दोन्ही गावांचा संपर्क अंशतः तुटला आहे. पुराचे पाणी मुख्य मंदिर परिसरापर्यंत पोहोचल्याने प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.
देहू आणि आळंदीतील सद्यस्थिती
देहू नगरीत पुराच्या पाण्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देहूतील मुख्य पूल आणि जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून संत तुकाराम महाराज मंदिर परिसर, वैकुंठस्थान आणि मुख्य घाट जलमय झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने घाटावरील व्यापाऱ्यांना दुकाने सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तर आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर परिसरातील मुख्य घाट आणि ‘भक्तिसोपान’ पूल पाण्याखाली गेला आहे. सिद्धेश्वर गल्लीसह नदीकाठच्या सखल भागांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाहतूक विस्कळीत, अनेक मार्ग बंद
पूल पाण्याखाली गेल्यामुळे देहू-आळंदी परिसरातील अंतर्गत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चाकण, तळेगाव आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणाऱ्या काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली आहे. पोलिसांनी धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले असून नागरिकांना पुलांवरून ये-जा करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
प्रशासन सज्ज; एनडीआरएफची मदत
पूरस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, “नदीचा जलस्तर सतत वाढत असून नागरिकांनी पुलांवर गर्दी करू नये तसेच सेल्फी काढण्यासाठी किंवा पूर पाहण्यासाठी नदीकाठच्या परिसरात जाऊ नये,” असे आवाहन प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
