ब्रम्हपुरी | ता.प्र. | ६ जुलै २०२६
ब्रम्हपुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत असलेल्या दैनंदिन गुजरीतील अंतर्गत रस्त्यांची पावसामुळे अत्यंत दुरवस्था झाली असून नागरिक, शेतकरी आणि दुकानदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर गुजरी परिसरात तातडीने मुरूम टाकून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, ब्रम्हपुरी शहरच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भाजयुमोच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दैनंदिन गुजरीमध्ये दररोज हजारो नागरिक खरेदी-विक्रीसाठी येत असतात. मात्र, सततच्या पावसामुळे संपूर्ण परिसर चिखलमय झाला असून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने अस्वच्छता वाढली असून अपघात होण्याचा तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गुजरी परिसरातील अंतर्गत रस्ते वाहतुकीस योग्य करण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने तातडीने मुरूम टाकून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी भाजयुमोकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, ब्रम्हपुरी शहरच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी भाजयुमो शहराध्यक्ष अमित रोकडे, महामंत्री पंकज माकोडे, उपाध्यक्ष बंटी येरावार, अक्षय झुरमुरे, भरत सावकार, सचिव केतन पेशने, कोषाध्यक्ष रोशन कावळे, गणेश जोगे, शुभम बोरसरे, जगदीश दोनाडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
