मारेगाव | प्रतिनिधी :
मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक ११, धामणी रोड परिसरात अवैधरित्या मटका सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. संबंधित प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील इतर अवैध धंद्यांवर कारवाई होत असताना संबंधित परिसरात मटका व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकारावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणात काही नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत, संबंधित यंत्रणांनी या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी आणि अवैध प्रकार सुरू असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित पोलीस किंवा प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
