
नेकनूर | प्रतिनिधी :
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीच्या पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आदी खरीप पिकांची पेरणी केली होती. मात्र त्यानंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळत नसून अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत.
पावसाअभावी शेतातील जमीन कोरडी पडली असून पिकांची वाढ खुंटली आहे. वेळेत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे ठाकले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशातील काही भागांमध्ये मान्सूनचा वेग मंदावण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. दरम्यान, शेतकरी आता आकाशाकडे डोळे लावून बसले असून लवकरात लवकर चांगला पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.
कृषी तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर खरीप हंगामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पीक व्यवस्थापन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
