औंढा नागनाथ | प्रतिनिधी
औंढा नागनाथ तालुक्यातील कोंडशी, असोला शिवारासह परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस आणि हळद ही प्रमुख पिके सुकू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
शेतकरी सध्या पिके वाचविण्यासाठी कोळपणी व खत देण्याची कामे युद्धपातळीवर करत आहेत. मात्र, पावसाअभावी या प्रयत्नांनाही अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने पेरणी केली असून आता पिके करपू लागल्याने आर्थिक नुकसानाची भीती वाढली आहे.
स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पुढील चार ते पाच दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर उभी पिके वाळण्याचा धोका निर्माण होईल. त्यामुळे दुबार पेरणीचे संकटही ओढवू शकते.
सध्या संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले असून लवकरात लवकर दमदार पाऊस पडावा, अशी प्रार्थना शेतकरी करत आहेत.










