पालघर | प्रतिनिधी
केळवारोड परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (११ जुलै) प्रांत अधिकारी मदनूरकर, नायब तहसीलदार शिंदे तसेच केळवारोडचे तलाठी यांनी केळवारोड रेल्वे ब्रिज ते देवीपाडा स्मशानभूमीपर्यंतच्या ओहळाची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी आगरी सेना जिल्हाप्रमुख चेतन गावड यांनी पूरस्थिती निर्माण होण्यामागील कारणे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत पूर नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली.
यामध्ये केळवारोड धरणातील साचलेला गाळ तातडीने काढणे, धरणापासून खाडीपर्यंतच्या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या ओहळाचे खोलीकरण व रुंदीकरण करणे, ओहळाच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमणे हटवून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह सुरळीत करणे तसेच रेल्वे ब्रिज क्रमांक ११५ ते देवीपाडा मार्गावरील जलनिकासी व्यवस्था नव्याने विकसित करण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
चेतन गावड यांनी धरणातील गाळामुळे पाणी साठवण क्षमता सुमारे ४० टक्क्यांनी कमी झाल्याचा तसेच ओहळाची वहनक्षमता घटल्याने भविष्यात पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी प्रांत अधिकारी मदनूरकर यांनी संबंधित मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल आणि प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
या पाहणीवेळी आगरी सेना जिल्हाप्रमुख चेतन गावड, उपसरपंच अतुल हाडळ, सुभाष किरमिरे, अक्षय वेडगा, समीर घरत, विशाल पाटील तसेच देवीपाडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.









