चांदवड | प्रतिनिधी
चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील पंचायत समिती कार्यालयासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात ट्रकचालक आणि दुचाकी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीबी-11-डीएल-4725 क्रमांकाचा ट्रक मालेगावकडील लेनकडे वळण्यासाठी रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभा होता. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच-15-जेझेड-1923 क्रमांकाच्या पल्सर दुचाकीने ट्रकच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले ऋषिकेश सुनील पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक गणेश संजय व्यहारे (रा. चांदवड) याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून चांदवड पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
