तेल्हारा | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पिवंदळ बु. परिसरातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक वान धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असूनही अनेक गावांपर्यंत पाणी पोहोचले नसल्याने नागरिकांना तीन किलोमीटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.
“धरण उशाशी अन् कोरड घशाशी” अशीच परिस्थिती सध्या या भागात निर्माण झाली असून, ग्रामस्थ वान धरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप पाणीपुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत प्रशासकीय दिरंगाई होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. परिणामी, महिलांसह नागरिकांना दररोज पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे.
या गंभीर समस्येची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वान धरणाचे पाणी लवकरात लवकर गावांपर्यंत पोहोचवावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


