
खटाव | प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील तडवळे येथील चौंडेश्वरी वस्तीवरील नागरिकांनी वहिवाटीचा रस्ता बंद झाल्याच्या निषेधार्थ तहसीलदार कार्यालयासमोर सामूहिक धरणे आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, गट क्रमांक 837 आणि 836 मधील बारा महिने वापरात असलेला वहिवाटीचा रस्ता संपत तुकाराम साबळे व त्यांच्या कुटुंबीयांनी बंद केला आहे. याबाबत तहसीलदार तसेच प्रांताधिकारी यांच्याकडे रस्ता खुला करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, मागणी मान्य न करता जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचे निर्देश देण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
तसेच गट क्रमांक 838 मधील शेताभोवती मोठे तारेचे कुंपण उभारल्यामुळे पर्यायी मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात चौंडेश्वरी वस्तीवरील सुमारे 35 ते 40 नागरिकांचा संपर्क तुटला असून, विहिरीवरील मोटार सुरू करणे, शेतीची कामे करणे तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे कठीण झाले असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
या समस्येवर तातडीने तोडगा काढून वहिवाटीचा रस्ता खुला करण्यात यावा, या मागणीसाठी श्रीरंग साबळे, शिवाजी श्रीरंग साबळे, सयाजी खेमाजी साबळे, प्रकाश लक्ष्मण साबळे, बचाराम दत्तू साबळे आणि बाळासाहेब दत्तू साबळे यांनी कुटुंबीयांसह तहसीलदार कार्यालयासमोर सामूहिक धरणे आंदोलन सुरू केले आहे.
प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मार्गाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
