प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संत जनाबाई विकास आराखड्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी राज्य शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावित विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी आराखड्याच्या विविध बाबींचा आढावा घेत लवकरात लवकर नियोजित विकास आराखड्याला मंजुरी देण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. श्रद्धा, संस्कृती आणि विकास यांचा समन्वय साधत महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील या प्रेरणास्थानाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी यापूर्वीच राज्य शासनाकडे ५० कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केला आहे. या आराखड्यात संत जनाबाई मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास, भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छता व्यवस्था, सुशोभीकरण, सुरक्षितता, मूलभूत सोयी-सुविधा तसेच धार्मिक पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर संत जनाबाईंच्या पवित्र स्थळाचा विकास होण्याबरोबरच स्थानिक रोजगार, पर्यटन, व्यापार आणि परिसराच्या आर्थिक विकासालाही गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
संत जनाबाई या वारकरी संप्रदायातील संतकवयित्री असून त्यांच्या अभंगांमधून समता, स्त्रीशक्ती, भक्तीभाव आणि मानवतेचा संदेश समाजाला मिळत असल्याने या ऐतिहासिक व आध्यात्मिक वारशाचे जतन करणे महत्त्वाचे असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
या बैठकीस परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, संबंधित विभागाचे सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

