
आठवडी बाजारही प्रभावित; आर्थिक व्यवहारांवर परिणाम
पाथरी | प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला पाथरी शहर आणि तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
बंदमुळे शहरातील प्रमुख बाजारपेठा, व्यापारी प्रतिष्ठाने आणि विविध व्यावसायिक आस्थापने दिवसभर बंद राहिली. नेहमी नागरिकांच्या वर्दळीने गजबजलेले शहर गुरुवारी तुलनेने शांत दिसून आले. रस्त्यांवरील वाहनांची वर्दळही कमी होती.
दरम्यान, गुरुवारी भरणारा पाथरीचा आठवडी बाजारही बंदमुळे प्रभावित झाला. त्यामुळे बाजारातील नियमित आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसून संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले. पाथरी तालुक्यातील नागरिकांनी बंदला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

