
लोकमान्य टिळकांचे दूरदृष्टीचे कार्य आजही प्रेरणादायी : उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड
कुरुंदवाड : प्रतिनिधी
भारतीय समाजात एकोपा निर्माण व्हावा, विविध जाती-धर्म आणि समाजातील विविध स्तरांतील नागरिकांनी एकत्र यावे तसेच राष्ट्रीय भावना जागृत व्हावी, या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले. त्यांचे हे दूरदृष्टीचे कार्य आजही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन इचलकरंजी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी केले.
वृंदावन मंगल कार्यालय येथे कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांतील लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शांतता समितीचे सदस्य या बैठकीस उपस्थित होते. यावेळी गायकवाड बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मनीषा डांगे होत्या, तर उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड प्रमुख उपस्थित होते.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि राष्ट्रभक्तीचे प्रभावी माध्यम ठरला आहे. आजच्या काळात गणेश मंडळांनी रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी यांसारखे सामाजिक उपक्रम राबवून समाजापुढे आदर्श निर्माण करावा, असे आवाहन विक्रांत गायकवाड यांनी केले.
आक्षेपार्ह कार्यक्रम टाळण्याचे आवाहन
सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी स्वागत व प्रास्ताविकात गणेशोत्सव हा सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढविणारा उत्सव असल्याचे सांगितले. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे देखावे, कार्यक्रम अथवा आक्षेपार्ह नाच-गाण्यांचे आयोजन करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
गणेशमूर्तीची स्थापना करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेणे, मिरवणुकीत लेझर लाईट, सीओटू गॅस आणि प्रेशर हॉर्नचा वापर टाळणे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा मनीषा डांगे, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, रामदास मधाळे, वीज वितरणचे शहर अभियंता स्वप्निल कोळी, अडसूळ, आयुब पट्टेकरी, नागेश गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त करून गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत विविध सूचना मांडल्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांचा नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार पो.हे.कॉ. अनिल चव्हाण यांनी मानले.
यावेळी उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, उदय डांगे, प्रदीप चव्हाण, शब्बीर बागवान, शुभम जोंग, उमेश कर्नाळे, साहिल गोलंदाज, अली बागवान यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
