लातूर | प्रतिनिधी
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, सुकर आणि सुरळीत व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) लातूर विभागाने विशेष नियोजन केले आहे. यंदा वारकऱ्यांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून विभागाकडून १४० विशेष एसटी बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या विशेष बससेवेचे नियोजन लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा या आगारांतून करण्यात आले असून, वारकऱ्यांना वेळेत आणि सुरक्षितपणे पंढरपूरला पोहोचविण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून, बसस्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी, वाहतूक नियोजन तसेच प्रवाशांच्या सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे.
विभागीय अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना खासगी वाहनांऐवजी एसटीच्या विशेष बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुलभ प्रवासासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध असून, वारकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.

