बार्शी टाकळी | प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला बार्शी टाकळी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातून शांततापूर्ण निषेध रॅली काढत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदविला.
रॅलीदरम्यान आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, तसेच संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली.
शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचा सन्मान राखण्याचे आवाहन करण्यात आले.

