| प्रतिनिधी
वीर गावातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर सातत्याने समोर येत असतानाही स्थानिक आमदार व खासदारांचे या गंभीर प्रश्नाकडे अद्याप पुरेसे लक्ष गेलेले दिसत नाही, अशी नाराजी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
रस्त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनचालकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
गावातील या मूलभूत प्रश्नासाठी चंद्रकांत जावळे यांनी पुढाकार घेत प्रशासनाकडे तातडीने रस्त्याची पाहणी करून दुरुस्ती अथवा नूतनीकरणासाठी कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
“रस्ता हा राजकारणाचा विषय नाही, तर गावातील नागरिकांच्या रोजच्या जीवनाशी संबंधित प्रश्न आहे. कोणावरही टीका करण्याचा आमचा उद्देश नाही; मात्र लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे,” अशी भूमिका चंद्रकांत जावळे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, प्रशासनाकडून लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही न झाल्यास गावातील युवक व ग्रामस्थांना सोबत घेऊन शांततामय आणि लोकशाही मार्गाने आंदोलन किंवा मोर्चा काढण्याचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
“गावाच्या विकासासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र यावे. प्रश्न मोठा असला तरी गावाची एकजूट असेल तर मार्ग नक्की निघेल,” असे आवाहनही करण्यात आले.











