जामनेर तालुक्यातील तळेगाव येथे अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई; ₹२६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन गुन्हे दाखल
जामनेर | विभागीय प्रतिनिधी
महेशप्रसाद दिक्षित
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जामनेर तालुक्यातील तळेगाव येथे अवैध दारू विक्रीविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत देशी दारू तसेच गावठी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन असा एकूण ₹२६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तळेगाव येथील जिल्हा परिषद शाळा तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरातील ‘कृष्णा जनरल स्टोअर अँड कोल्ड्रिंक्स’ या दुकानाची तपासणी करण्यात आली. यावेळी ३.९६ बल्क लिटर देशी दारू आढळून आली. संबंधिताविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक संजय कुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक योगेश राठोड यांनी केली. कारवाईदरम्यान एकूण ३.९६ लिटर देशी दारू, ३० लिटर गावठी दारू आणि ४८० लिटर रसायन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईनंतरही अवैध धंदे सुरूच का?
अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली जात असली, तरी काही ठिकाणी कारवाईनंतर पुन्हा अवैध दारू विक्री सुरू होत असल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘कारवाई केवळ नाममात्र होते का?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शाळा व ग्रामपंचायत कार्यालयासारख्या सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात अवैध दारूचा साठा आढळून येणे ही गंभीर बाब मानली जात आहे. अशा अवैध धंद्यांवर सातत्याने कठोर कारवाई करून संबंधितांमध्ये प्रशासनाचा धाक निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अवैध दारू विक्रीला कोणत्याही प्रकारचे संरक्षण किंवा प्रोत्साहन मिळू नये आणि अशा धंद्यांवर नियमित तपासणी व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.








