शहादा,दि.14 (का.प्र.)
शहादा शहरात व्हॉलंटरी महिला मंडळ शाळा, लाडकोबाई माध्यमिक शाळा व विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तिरंगा रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. हातात राष्ट्रध्वज घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर दिलेल्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. या रॅलीमुळे शहाद्यात सर्वत्र देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.
तिरंगा रॅलीची सुरुवात व्हॉलंटरी महिला मंडळ शाळेपासून करण्यात आली. तेथून निघालेली ही रॅली जनता चौक, नगरपालिका, गांधी पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, स्टेट बँक आणि विकास हायस्कूल या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा शाळेच्या परिसरात पोहोचली. या प्रवासात विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन भारतमातेचा जयघोष करत विविध देशभक्तीपर घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे रॅलीत विशेष उत्साह पाहायला मिळाला. तिरंग्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि राष्ट्रभावना जागृत करण्याचा मोलाचा संदेश या रॅलीद्वारे देण्यात आला.
याप्रसंगी उपनगराध्यक्षा सौ.माधवी मकरंद पाटील, संस्थेचे सचिव ॲड. राजेश कुलकर्णी, सौ.प्रवीणा राजेश कुलकर्णी, मुख्याध्यापिका प्रतिभा बोरसे, प्राचार्य नयना पाटील, सुनिता पाटील, विजया पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रॅलीच्या यशस्वी समारोपानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेमाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या तिरंगा रॅलीचे शहादा शहरवासीयांकडून सर्वत्र मनापासून कौतुक होत आहे.











