तहसीलदार अर्चना कापसे यांच्यामार्फत मागणी, आमदार रोहित दादा पाटील उपस्थित
कवठे महांकाळ तालुका प्रतिनिधी:
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दिगंबर कांबळे यांनी पालकमंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन दिले.
हे निवेदन कवठे महांकाळच्या तहसीलदार मा. अर्चना कापसे यांच्यामार्फत देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा लढा अद्यापही सुरू आहे. मात्र महामार्ग रद्द करण्याबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या विषयात लक्ष घालून शक्तिपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनावेळी तासगाव-कवठे महांकाळचे आमदार मा. रोहित दादा पाटील आणि कवठे महांकाळचे पोलीस निरीक्षक मा. प्रवीणकुमार कांबळे हे देखील उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या जमिनी, उपजीविका आणि पर्यावरणाचा विचार करून हा निर्णय घ्यावा, अशी भूमिका यावेळी शेकाप नेत्यांनी मांडली.
बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांनी देखील या मागणीला पाठींबा दिला आहे.











