माजी मंत्री मधुकरराव चव्हाण; जवाहर महाविद्यालयात राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धेत ३२ स्पर्धकांचा सहभाग
अणदूर, दि. २९ : थोर शिक्षणमहर्षी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार कै. सि. ना. आलुरे गुरुजी यांच्याशी माझी सुमारे साठ वर्षांची मैत्री होती. त्यांच्या आठवणी आजही सुखद आनंद देतात. आलुरे गुरुजींनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणून गोरगरीब व वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आणि त्यांना स्वावलंबी बनविले, असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
अणदूर येथील जवाहर महाविद्यालयात शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. “मोबाईल आणि सोशल मीडिया : ज्ञानाचे विश्व की व्यसनाचा विळखा” या विषयावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून राज्यभरातून ३२ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, अणदूरचे सचिव रामचंद्र दादा आलुरे होते. यावेळी प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष माणिक आलुरे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे आणि स्पर्धेच्या समन्वयक प्रा. डॉ. अनिता मुदकन्ना उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, सचिव रामचंद्र दादा आलुरे तसेच उपस्थित मान्यवरांचा प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, अणदूरच्या जवाहर परिवाराने शिक्षणाचा आदर्श पॅटर्न महाराष्ट्रासमोर उभा केला आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा, विविध कलागुणांचा आणि सांस्कृतिक विकासाचा विचार संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे, ही आनंदाची बाब आहे. जवाहर परिवाराने अभ्यासक्रमाचा अभिनव पॅटर्न राबविल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांनी या राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धेच्या माध्यमातून शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजींचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत असून वर्षानुवर्षे स्पर्धेची व्याप्ती व महत्त्व वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. आजचा युवक मोबाईलच्या अतिवापरामुळे त्याचा गुलाम होऊ पाहत असून, युवकांनी ज्ञानार्जनाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात सचिव रामचंद्र दादा आलुरे यांनी मोबाईलचा वापर ज्ञान आणि विज्ञानासाठी करावा, तो आपला रक्षक ठरावा, भक्षक नव्हे, असे आवाहन केले. तंत्रज्ञानाचा योग्य आणि जबाबदारीने वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी अभ्यासपूर्ण मांडणी, प्रभावी वक्तृत्व आणि विषयाला अनुरूप युक्तिवादातून आपली गुणवत्ता दाखवून दिली. ज्येष्ठ पत्रकार रविंद्र केसकर, ज्येष्ठ साहित्यिक अरविंद जोशी आणि प्रा. डॉ. राजशेखर शिंदे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक यश रवींद्र पाटील व अभय कृष्णात आळशी (मुंबई विद्यापीठ), द्वितीय क्रमांक आकाश दत्तात्रय मोहिते व महेश जनार्दन उशीर (न्यू आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, पारनेर), तर तृतीय क्रमांक दिव्या मच्छिंद्र सूर्यवंशी व पौर्णिमा कुलींद मस्के (राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर) यांनी मिळविला.
उत्तेजनार्थ पारितोषिक सुजाता रविशंकर गडी लोहार व अनिसा हमीद मुजावर (शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय, लोहारा) यांना देण्यात आले. प्रभावी वक्ता म्हणून सुप्रिया नेताजी मुगळे (कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, माकणी) आणि प्रतीक्षा सिद्धार्थ गायकवाड (जवाहर महाविद्यालय, अणदूर) यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मल्लिनाथ बिराजदार यांनी केले, तर आभार डॉ. राजशेखर नळगे यांनी मानले. कार्यक्रमास धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी सभापती ॲड. दीपक आलुरे, चंद्रशेखर कंदले गुरुजी, व्हलदुरे गुरुजी, विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








