गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शाळेच्या विकासासाठी विविध योजनांची घोषणा..!
जामखेड (प्रतिनिधी):जि. प. प्राथमिक शाळा, सारोळा येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीपूर्ण वातावरणात व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्री. बापूराव नामदेव तांबे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सारोळा गावच्या सरपंच सौ. रितूताई अजय काशिद तसेच श्री. अजय (दादा) काशिद उपस्थित होते. याशिवाय गावातील मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, माता-पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर केली. ‘जिंदगी मौत ना बन जाये’ या गीतावर लेझिमचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. तसेच देशभक्तीपर गीतांवर कवायत व संचलन सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ‘व्यसनमुक्त विद्यार्थी–व्यसनमुक्त महाराष्ट्र’ तसेच ‘असाक्षरमुक्त गाव’ या संकल्पांची सामूहिक शपथ घेण्यात आली. नवभारत साक्षरता अभियान (उल्लास) अंतर्गत साक्षर झालेल्या व्यक्तींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
🏫 शाळेच्या विकासासाठी भरीव योगदानाची घोषणा
कार्यक्रमात सरपंच श्री. अजय (दादा) काशिद यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. प्रसिद्ध उद्योजक श्री. भीमराव गोविंदराव सांगळे यांच्या नेतृत्वाखाली बी. जी. शिर्के कंपनीच्या CSR निधीतून मल्टीपर्पज हॉल, जिल्हा परिषदेमार्फत दोन वर्गखोल्या, तसेच नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून पाच संगणक भविष्यात उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासन देण्यात आले.
🏆 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
मागील शैक्षणिक वर्षात इयत्ता ४ थी, ५ वी, ७ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा, NMMS, मंथन स्पर्धा परीक्षा, जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा तसेच महाराष्ट्र राज्य बालचित्रकला तालुकास्तरीय स्पर्धा आदी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या गुणवंत विद्यार्थ्यांना सारोळा गावचे भूमिपुत्र व प्रसिद्ध उद्योजक श्री. भीमराव गोविंदराव सांगळे यांच्या वतीने ₹११,००० चे बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
🤝 ‘मिशन आपुलकी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
मिशन आपुलकी अंतर्गत तब्बल ₹१२,१०० लोकसहभागातून जमा झाले. शाळेच्या विकासासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचे तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविणाऱ्या माता-पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे ग्रेड मुख्याध्यापक श्री. संदिप भालसिंग, पदवीधर शिक्षक श्री. सुरेश बर्वे, श्री. राहुल लिमकर, उपाध्यापक श्री. प्रशांत होळकर, श्रीमती शबाना शेख, श्रीमती वृषाली खांदवे, सौ. अमृता रसाळ तसेच शाळा व्यवस्थापन समिती, सारोळा यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन, शाळेच्या विकासाला लोकसहभाग आणि देशभक्तीचा जागर—अशा त्रिवेणी संगमात सारोळा जि. प. प्राथमिक शाळेचा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.











